आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी लोकलच्या डब्यातून प्रवास करत असल्याचं या व्हिडीओत दिसत असून, त्यामुळे त्याचं कौतुकही होत आहे.
ADVERTISEMENT
बॉलिवूडमधील कलाकारांच्या गर्दी स्वतःचं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा चाहता वर्ग आहे. गेल्या काही वर्षापासून नवाजुद्दीन प्रसिद्धीच्या झोतात आहे. बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेता म्हणून पाय रोवल्यानंतरही नवाजुद्दीनचे पाय अजूनही जमीनीवरच असल्याचं तो नेहमीच त्या कृतीतून दाखवून देत असतो.
नवाजुद्दीने गावी गेल्यानंतर शेतीतील कामं करतो. लॉकडाऊनच्या काळातही त्याचे शेतीत काम करतानाचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले होते. आता त्याची चर्चा करण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला त्याचा एक व्हिडीओ.
नवाजुद्दीन सिद्दीकीने पुन्हा एकदा चित्रीकरणाच्या कामाला सुरूवात केली असून, त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये तो व्यस्त आहे. त्यातच नवाजुद्दीनला एका कार्यक्रमाला जायचं होतं आणि त्यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकीला अलिशान गाडी सोडून लोकलमधून प्रवास करावा लागला.
अभिनेता नवाजुद्दीने सध्या मीरा रोड परिसरात त्याच्या चित्रपटाचं शुटिंग करत आहे. दरम्यान, नवाजुद्दीनला एका कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं. मीरा रोडपासून कार्यक्रमाचं ठिकाण बरंच लांब होतं. कारमधून जाताना ट्र्रॅफिकमध्ये अडकण्याची भीती असल्यानं आणि त्यामुळे कार्यक्रमात वेळेवर पोहोचू शकू की नाही, या अनिश्चिततेमुळे नवाजुद्दीनने अलिशान कारमधून प्रवास करायचं टाळून थेट लोकल पकडली.
नवाजुद्दीनचा हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी टी-शर्ट आणि ट्राऊजरमध्ये दिसत आहे. पांढऱ्या रंगाचा मास्क आणि सनग्लासेस घातलेला आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट बघताना अभिनेता दिसत असून, त्यानंतर लोकलच्या डब्यातून प्रवास करताना दिसतो.
नवाजुद्दीन सिद्दीक लवकरच आगामी सिनेमा टीकू वेड्स शेरूमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची सध्या चर्चा असून, प्रेक्षकांचा या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कळणार आहे.
ADVERTISEMENT