कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
पुनीत यांना आज दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरुतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयू उपचार सुरु होते. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.त्यांच्या निधनानंतर कन्नड सिनेसृष्टीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.
पुनीत राजकुमार हा कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. पुनीत हे २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अप्पू या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. त्याने आतापर्यंत कन्नडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र या चित्रपटात काम केले आहे.
ADVERTISEMENT