अभिनेता आरोह वेलणकरची सध्या झोप उडाली आहे. कोणत्याही कामामुळे,टेन्शनमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे अभिनेता आरोह वेलणकरला झोप लागत नाहीये. आरोह वेलणकर मुंबईत राहत असलेल्या बिल्डिंगमागे असलेल्या मशिदीमधून वेळीअवेळी जोरजोरात होणाऱ्या अजानमुळे त्याची सध्या झोप उडाली आहे. आरोहने बुधवारी भल्या सकाळी सोशल मिडीयावर याचा व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिली. आरोहने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की माझ्या घराच्या मागे असलेल्या पठाणवाडी या भागातील मशिदीमधून कोणत्याही वेळी जोरजोरात अजानचे आवाज येत असतात, त्यामुळे आमच्या परिसरातील नागरिकांची झोपेच्या वेळी प्रचंड गैरसोय होते.
ADVERTISEMENT
अभिनेता आरोह वेलणकर मुंबईतील दिंडोशी भागातील कोर्टाशेजारी असणाऱ्या सुचिधाम सोसायटीत राहतो. या सोसायटीच्या बरोबर मागे पठाणवाडी नावाची वस्ती आहे. या वस्तीतच एक मशिद आहे. या मशिदीमध्ये दिवसातून ५ वेळा मोठ्या आवाजात अजानचे स्वर येत असतात. याबद्दल आरोहने यापूर्वीही सोशल मिडीयावर पोस्ट केली होती. ज्यात त्याने आपल्याला या गोष्टींचा प्रचंड त्रास होत असल्याचा पुनुरच्चार केला होता. बुधवारी भल्या सकाळी आरोह वेलणकरने आपल्या सुचिधाम सोसायटीतील घरातून मागच्या मशिदीमधील मोठ्याने आवाज होणाऱ्या अजानचा आवाज एेकवला. ज्यामुळे त्याला आणि येथील नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचं सांगितलं. यापूर्वी २०१७ मध्ये गायक सोनू निगमनेही अजानमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सोशल मिडीयावर पोस्ट केली होती. ज्यात त्याने वेळीअवेळी वाजणाऱ्या अजानबद्ल म्हटलं होतं. तेव्हा खूप मोठा वादही निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे आरोहने आज मोठ्याने होणाऱ्या अजानविरोधात व्हिडिओ पोस्ट केला आहे.
अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या मराठी चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रेगे हा त्याचा पहिलाच मराठी चित्रपट. त्याच्या अभिनय कौशल्यामुळे त्याला ‘घंटा’ या मराठी चित्रपटात काम मिळाले.यानंतर ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसर्या पर्वातील धमाकेदार वाईल्ड कार्ड एण्ट्रीमुळे आरोह कायमच चर्चेत राहिला. आरोह ‘बिग बॉस मराठी २’ मधील टाॅप ५ स्पर्धकांपैकी एक स्पर्धक होता.अभिनया व्यतिरिक्त आरोहला समाजकार्याची आवड आहे. आरोह अनेक सामाजिक संस्थांबरोबर संलग्न आहे. ‘आय व्होट’ सारख्या वेगवेगळ्या जनजागृती मोहिमांमध्ये तो सहभागी झाला आहे. दिव्यांगांसाठीही तो काम करत असतो. सध्या तो लाडाची मी लेक ग या मालिकेत डॉक्टर सौरभची प्रमुख भूमिका साकारत आहे.
ADVERTISEMENT