कोरोनाच्या रूग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार का असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. तर कोरोनाच्या या संकटाचा परिणाम बॉलिवूड सिनेमांवरही झालेला पहायला मिळतोय. कोरोनाचे वाढती रूग्णसंख्या पाहता अमिताभ बच्चन स्टारर असलेल्या चेहरे सिनेमाची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
2020मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बॉलिवूड सिनेमे थिएटर बंद असल्याने रिलीज होऊ शकले नाहीत. यामध्ये अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांचा चेहरे सिनेमा रिलीज होऊ शकला नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी चेहरे सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार एप्रिलमध्ये हा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र पुन्हा एकदा सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.
दरम्यान चेहरे सिनेमा कधी रिलीज होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. इम्रान हाश्मीने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. इम्रान त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, “आमच्यासाठी प्रेक्षकांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे. तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत दिलेलं प्रेम आणि समर्थन याबद्दल आम्ही रसिकांचे आभार मानतो. लवकरच भेटू, तोवर सुरक्षित राहा.”
चेहरे सिनेमाची घोषणा 11 एप्रिल 2019 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्यात या सिनेमाच्या शूटींगलाही सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी 17 जुलै 2020 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यात आला नाही. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मीसोबत अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील दिसणार आहे.
ADVERTISEMENT