भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग सध्या व्यस्त आहे. मात्र हरभजन कोणतंही प्रॅक्टिस सेशन किंवा कॉमेंट्रीमध्ये व्यस्त नसून सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. हरभजन सिंगच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे लवकरच फिरकीपटू हरभजन सिंग मोठ्य़ा पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ADVERTISEMENT
हरभजन लवकरच ‘फ्रेंडशिप’ या सिनेमाच्या माध्यमातून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. हरभजनचा हा सिनेमा तमिळ भाषेत असणार आहे. हरभजनने त्याच्या या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावरून शेअर देखील केलाय. हरभजनला सिनेमात पाहण्यासाठी त्याचे चाहते फार उत्सुक आहेत.
हरभजनने टीझर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर फॅन्सने त्याची प्रशंसा करण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमात अॅक्शन सीन तसंच डान्स करताना हरभजन दिसणार आहे. हरभजनने ट्विटर अकाऊंटवर ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचा टीझर शेअर करत ‘शार्प, क्रिस्प, इंटेन्स.. माझा आगामी सिनेमा फ्रेंडशिपचा टीझर प्रदर्शित’ असं कॅप्शन दिलंय. या सिनेमाचा टीझरही तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा जरी तमिळ भाषेत असला तरीही हिंदीमध्येही डब करण्यात येणार आहे.
‘फ्रेंडशिप’ या सिनेमाचं दिग्दर्शन पॉल राज आणि सूर्या करत आहेत. यामध्ये अर्जुन तसंच तमिळ ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लोसलिया मारियानेसन दिसणार आहे. गेल्या वर्षी 7 ऑगस्ट रोजी हरभजनचा हा सिनेमा रिलीज करण्यात येणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
ADVERTISEMENT