एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका ‘देवमाणूस’वर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत ‘किरण गायकवाड’ याने आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिकली आहेत. या मालिकेत आलेल्या विलक्षण वळणाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.
ADVERTISEMENT
भर लग्नमंडपातून अजितला अटक झाल्यानंतर त्याची झालेली नाचक्की आणि अपमान डॉक्टर सहन करू शकत नाहीये, या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागलेयत ह्यासाठी तो डिम्पलची मदत घेतोय. इकडे सगळं गाव डॉ. अजितच्या मागे उभं आहे कारण तो गावासाठी देवमाणूस आहे. पण ए.सी.पी. दिव्या सुद्धा आपल्या निर्णयावर ठाम आहे तिने अजित विरुद्धचे सगळे पुरावे गोळा केलेत आणि ते मी कोर्टातच सगळ्या जगासमोर आणेन आणि ह्या देवमाणसामागे लपलेला खरा चेहेरा बाहेर आणेन असं ती ठामपणे सांगते.
यातच डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग खटल्याची कोर्टाची तारीख मिळाली आहे, पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना संपूर्ण गाव बाहेर जमलाय. अजित त्याची केस स्वतच लढणार असं ठरवतो. दिव्या आणि सरकारी वकील यांना अजितच्या चतुरपणाची कल्पना येते. डिम्पलच्या घरातील सगळे अजूनही अजितच्या बाजूने आहेत. समोर येणारे साक्षीपुरावे पाहून ते देखील संभ्रमात आहेत. आता पुढे ही कोर्टकेस कशी सरकेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT