तांडव वेब सिरीजच्या वादानंतर आता अजून एक सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. नेटफ्लिक्सवरील बॉम्बे बेगम सिरीज अडचणीत आली आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी ही सिरीज रिलीज करण्यात आली होती. दरम्यान सिरीजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने सिरीजचं स्ट्रिमिंग थांबवण्यास सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
बाल हक्क संरक्षण आयोगाने बॉम्बे बेगम सिरीजच्या कंटेटवर नोटीस पाठवली आहे. त्यातप्रमाणे येत्या 24 तासांच्या आत नेटफ्लिक्सला एक सविस्तर रिपोर्ट देण्याचेही आदेश दिले आहेत. दरम्यान अहवाल सादर न केल्यास आवश्यक ती कारवाई करण्याचा इशारा देखील आयोगाकडून देण्यात आला आहे.
आयोगाने नेटफ्लिक्सला पाठवलेल्या नोटीसमध्ये या सीरीजमध्ये लहान मुलांशी संबंधित काही दृश्ये अशी आहेत की, ज्याने मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतील असं म्हटलंय. तसंच लहान मुलांना या सिरीजमध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं असून याचा परिणाम लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचार आणि शोषणामध्ये होऊ शकतो असंही आयोगाचं म्हणणं आहे.
दरम्यान बॉम्बे बेगम या वेब सिरीजमध्ये समाजातील 5 महिलांच्या आय़ुष्याची कहाणी सांगण्यात आली आहे. या सिरीजचं दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव यांनी केलं आहे. या सिरीजमध्ये पूजा भट्ट तसंच अमृता सुभाष, शाहाना गोस्वामी, आध्या आनंद आणि प्लाबिता बोरठाकूर मुख्य भूमिकेत आहेत.
ADVERTISEMENT