गेल्या काही दिवसापासून अखिल भारतीय नाट्यपरिषदमध्ये सुरू असलेल्या वादांना, विरोधकांच्या कुरघोड्यांना मंगळवारी पत्रकार परिषद घेत आणि योग्य ते पुरावे सादर करत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रसाद कांबळी अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. ते भ्रष्ट कारभार करत आहेत, त्यांना पायउतार व्हावं लागेल, या त्यांच्या विरोधकांनी उठवलेल्या बातम्यांना एक प्रकारे चाप लागला आहे. नाट्यपरिषदेचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रसाद कांबळी यांनी त्यांच्या २०१८ ते २०२१ मधील अध्यक्षीय कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला, यात त्यांनी विरोधकांनी केलेल्या प्रत्येक आरोपाची तथ्यानुसार आणि पुराव्यासहित आपलं म्हणणं पवारांसमोर मांडलं. यानंतर शरद पवारांनी तुम्ही ही सगळी तथ्यं मिडीयासमोर जाहिर करा, आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना उत्तर द्या अशी सूचना केली. यानंतर मंगळवारी पत्रकार परिषद घेत प्रसाद कांबळींनी पुराव्यासहित विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तरं दिली. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या पोकळ आरोपांना आता चाप बसली असून ,प्रसाद कांबळींना अध्यक्षपदापासून हटवता येणार नाही आणि विश्वस्त म्हणून शरद पवारांनी तथ्यासहित पुराव्याची छाननी केल्यामुळे प्रसाद कांबळी राजीनामा देणार या बिनबुडाच्या बातम्यांना आता तरी चाप बसला आहे.
ADVERTISEMENT
नेमका काय आहे वाद?
2018 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत प्रसाद कांबळी नेतृत्व करत असलेल्या पँनेलने निवडणुकीत विजय मिळवून अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या पँनेलचा पराभव केला होता. आणि प्रसाद कांबळी नाट्यपरिषदेचे ५ वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. नाट्यपरिषदेच्या कार्यकारणीत अध्यक्षांसह मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागातून निवडून आलेल्या सभासदांमधून ६४ जणांची निवड होते. अश्याप्रकारे नाट्यपरिषदेचं नियामक मंडळ आणि कार्यकारणी सदस्य अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली नाट्यपरिषदेचा कारभार करत असतात. प्रसाद कांबळींच्या नेतृत्वात मुलंडचं ९८ वं नाट्यसंमेलन आणि नागपूरचं ९९ वं नाट्यसंमेलन पार पडलं. आणि २०२० ला १०० वं नाट्यसंमेलन मोठ्या थाटामाटात पार पडणार होतं. मात्र मार्चमध्येच भारतात कोरोनाचा कहर झाल्याने १०० वं नाट्यसंमेलन रद्द करण्यात आलं. या नियोजित नाट्यसंमेलनाचे ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल हे नाट्यसंमेलनाध्यक्ष होते. कोरोनाच्या काळात नाटकव्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. त्यामुळे नाटकावर पोट असणाऱ्या रंगमंच कामगारांना नाटकाची मातृसंस्था नाट्यपरिषदेने रंगमंच कामगारांना नाट्यपरिषदेच्या फंडातून कायद्यानुसार आर्थिक मदत केली. या मदतीनंतर या वादाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. नाट्यपरिषदेतील प्रसाद कांबळींच्या विरोधकांना या मदतीवरच आक्षेप घेत, प्रसाद कांबळींनी या मदतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले, प्रसाद कांबळी मुंबईत किचन कँबिनेट घेतात आणि मुंबई बाहेरील नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना जुमानत नाहीत,त्यांना विश्वासात घेत नाहीत असे आरोप विरोधकांनी लावले आहेत. याचा परिणाम म्हणजे ६५ सदस्यांपैकी ३६ सदस्यांनी प्रसाद कांबळींच्या कारभारावर ताशेरे ओढत त्यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून पायउतार करण्यासाठी सह्यांची मोहिम राबवली आणि १८ फेब्रुवारीला नियामक मंडळाची बैठक बोलावून त्यामध्ये प्रसाद कांबळींना अल्पमतात आणून अध्यक्षपदावरून हटवण्याच्या व्यूहरचना रचल्या.
यावर उत्तर देण्यासाठी आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांवर पुरावे सादर करण्यासाठी प्रसाद कांबळी यांनी मंगळवारी माध्यमांसमोर पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेत त्यांनी नाट्यपरिषदेचे विश्वस्त शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना आपण विरोधकांनी केलेल्या आरोपांविरोधात पुरावे सादर केल्याचे सांगितले. विरोधकांनी नाट्यपरिषदेच्या घटनेचा अभ्यास न करता प्रसाद कांबळीवर बिनबुडाचे आरोप केल्याचं तथ्य शरद पवारांना समजल्यावर पवारांनी प्रसाद कांबळींना ही सर्व तथ्य माध्यमांसमोर उघड करण्याच्या आणि स्वत:ची बाजू मांडण्याच्या सूचना केल्या.. कारण विरोधकांनी कोणताही ठोस पुरावा नसताना माध्यमांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप प्रसाद कांबळी यांनी केला. तसंच १८ फेब्रुवारीला विरोधात केलेल्या कार्यकारणी सदस्यांनी बोलावलेली नियामक मंडळाची सभा ही घटनाबाह्य असल्यामुळे ती सभा कायद्याने नामंजूर असल्याने जी सभाच होऊ शकत नाही तर राजीनामा कसा आणि कुठुन मागताय? या प्रश्नांना प्रसाद कांबळींनी सडेतोड उत्तर दिलं. त्यामुळे विविध माध्यमांत चालणाऱ्या प्रसाद कांबळी राजीनामा देणार या बातम्यांना आता शरद पवारांनी दिलेला पाठिंबा आणि प्रसाद कांबळींनी माध्यमांसमोर ठेवलेल्या विरोधकांविरोधतल्या पुराव्यामुळे राजीनामानाट्याच्या वादावर सध्यातरी पडदा पडला आहे.
ADVERTISEMENT