कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित होऊन मनोरंजन विश्व गेले दिडवर्षे ठप्प आहे. मानसिक तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलावंतांच्या वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा यासाठी ‘रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र’ यांच्या वतीने क्रांतीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
ADVERTISEMENT
अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दादर येथील स्व. दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाशेजारी हे आंदोलन केले गेले. अनेक रंगकर्मीनी आपल्या कलांचे सादरीकरण यावेळी केले. ‘जागर रंगकर्मींचा’ हा कार्यक्रम सादर करून कलाकारांनी आपल्या मागण्या यावेळी मांडल्या. आंदोलन करणाऱ्या विजय पाटकर, विजय राणे, मेघा घाडगे, संचित यादव, शीतल माने या रंगकर्मीना यावेळी भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही तसेच मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत भोईवाडा पोलिस स्टेशन बाहेरच ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला आहे. सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार तंत्रज्ञांसोबतच तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज, नंदीबैल, पिंगुळा, भराड इ.लोककला सादर करणाऱ्या तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील १००० हून अधिक कलाकार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
ADVERTISEMENT