Murlidhar Mohol Tweet : राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटून गेला, तरी मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. दिल्लीत भाजपचे केंद्रीय नेते आणि राज्यातील महायुतीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या, पण अजूनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडले अशा शक्यता वर्तवल्या जात असतानाच, आता दुसरीकडे आणखी एका नावाची चर्चा सुरू झाली होती. ते नाव म्हणजे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ. भाजप हायकमांड धक्कातंत्र वापरून त्यांना मुख्यमंत्री करेल अशी शक्यता सोशल मिडीयावरील चर्चांमधून व्यक्त केली जातेय. अशातच आता मुरलीधर मोहोळ यांच्या ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
"समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे."
दरम्यान, मुरलीधर मोहोळ आणि अमित शाह यांच्यात गेल्या 25 तारखेला भेट झाली होती. तसंच देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्या देण्यासाठी भेटणाऱ्यांच्या यादीतही मुरलीधर मोहोळ यांचं नाव होतं. त्यामुळे मोहोळ यांच्या नावाची चर्चा होत असताना हे फोटोही व्हायरल होत आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे खासदार झाले आहेत. त्यापूर्वी मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर देखील राहिले आहेत. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानं त्यांना मोठी लॉटरी लागल्यानं तेव्हा मोहोळ यांच्या नावाची मोठी चर्चा झाली होती.
हे ही वाचा >> अमित शाहांसोबतचे 'ते' दोन फोटो शिंदेंनी का केले नाही शेअर?, अचानक निघून गेले गावी!
राज्यात 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असूनही, मुख्यमंत्रीपदावर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं दिसत नाही. 28 तारखेला दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली, त्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार हे नेते उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यात असलं तरी, फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
ADVERTISEMENT