२० मार्च १९२७ ला महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला. हा सत्याग्रह म्हणजे समतेचा संगर. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून हा दिवस समता दिन, सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच महाड सत्याग्रह परिषदेत आपल्या अध्यक्षीय भाषणात समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठीच ही सभा बोलावण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं.
ADVERTISEMENT
भारतातल्या समतेच्या लढ्यात महाडच्या सत्याग्रहाला खूप महत्त्व आहे. सत्याग्रह परिषदेच्या सभेसाठी त्या काळात ७-८ हजार लोक बसू शकतील एवढा भव्य सभामंडप उभारण्यात आला होता. याच सभेला संबोधित करताना डॉ. आंबेडकरांनी या सभेची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली होती. डॉ. आंबेडकरांच्या याच ऐतिहासिक भाषणाचा संपादित अंश इथे देत आहोत.
सद्गृहस्थ हो!
सत्याग्रह कमिटीच्या आमंत्रणास मान देऊन आपण आज येथे आलात, याबद्दल कमिटीचा अध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांचे स्वागत करतो.
आपल्यापैकी पुष्कळ जणांना आठवत असेल, की आपण सर्व मिळून गेल्या मार्च महिन्याच्या १९ व्या तारखेत येथील चवदार तळ्यावर गेलो होतो. आपल्याला तळ्यावर जरी महाडच्या स्पृश्य लोकांनी हरकत केली नव्हती, तरी त्यांची या कामी हरकत आहे. हे त्यांनी मागाहून मारामारी करून आपणास जाणविले. त्या मारामारीचा शेवट ज्या रीतीने व्हावयाचा त्या रीतीने झाला. मारामारी करणाऱ्या स्पृश्य लोकांस चार-चार महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली आणि ते लोक आज तुरुंगात आहेत.
१९ मार्च रोजी जर आपल्याला अडथळा आला नसता, तर आपल्याला ह्या तळ्यावर पाणी भरण्याचा हक्क स्पृश्य लोकांस मान्य आहे, असे शाबीत झाले असते आणि आपणास आजचा हा उपक्रम करावा लागला नसता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. म्हणून आजची ही सभा बोलाविणे भाग पडले आहे. महाडचे हे तळे सार्वजनिक आहे. महाड येथील स्पृश्य लोक इतके समजूतदार आहेत, की ते आपण या तळ्याचे पाणी नेतात असे नव्हे, तर कोणत्याही धर्माच्या माणसाला त्या तळ्याचे पाणी भरण्यास त्यांनी मुभा ठेविली आहे व त्याप्रमाणे मुसलमानादी परधर्मीय लोकही या तळ्याचे पाणी नेतात.
मानव योनीपेक्षा कमी मानलेल्या पशुपक्ष्यादी योनीतील जीवजंतूंस या तळ्यावर पाणी पिण्यास ते हरकत करीत नाहीत. इतकेच नव्हे, तर अस्पृश्यांनी बाळगिलेल्या जनावरांनादेखील ते खुशाल पाणी पिऊ देतात. स्पृश्य हिंदू लोक दयेमायेचे माहेरघर आहेत. ते कधी हिंसा करीत नाहीत आणि कोणाचा छळ करीत नाहीत. उष्ट्या हाताने कावळा न हाकणाऱ्या कृपण आणि स्वार्थी लोकांचा हा वर्ग नाही. साधुसंतांची आणि याचकांची झालेली बेसुमार वाढ ही त्यांच्या दादृत्वाची जागती ज्योत साक्ष आहे.
BLOG : जाती मीमांसा! गांधी- आंबेडकर
परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप अशी त्यांची वागणूक आहे. इतकेच नव्हे, तर ‘दिधले दुःख पराने उसने फेडू नयेचि सोसावे’ हा त्यांचा स्वभावधर्म आहे आणि म्हणूनच गाईसारख्या निरुपद्रवी प्राण्याला जसे ते दयेने वागवतात तसे सर्वासारख्या उपद्रवी कृमी कीटकांचीही ते रक्षा करतात. अर्थात ‘सर्वांभूती एक आत्मा’ असे त्यांचे शील आहे. असे हे स्पृश्य लोक आपल्याच धर्मातील काही माणसांना त्याच चवदार तळ्यातील पाणी घेण्यास बंदी करितात, असा प्रश्न कोणाच्याही मनात उद्भवल्याखेरीज राहणार नाही. या प्रश्नाचे उत्तर काय आहे हे सर्वांनीच नीट समजून घेणे अत्यंत जरुरीचे आहे. त्याशिवाय आजच्या सभेचे महत्त्व पूर्णपणे आपल्या लक्षात येईल, असे मला वाटत नाही.
महाडचे स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांना चवदार तळ्याचे पाणी पिऊ देत नाहीत याचे कारण, अस्पृश्यांनी स्पर्श केला असता ते पाणी नासेल किंवा त्याची वाफ होऊन ते नाहीसे होईल अशामुळे नव्हे, अस्पश्यांना ते पिऊ देत नाहीत याचे कारणे हेच, की शास्त्रांनी असमान ठरविलेल्या जातींना आपल्या तळ्यात पाणी भरू देऊन त्या जाती आपल्यासमान आहेत असे मान्य करण्याची त्यांची इच्छा नाही.
सत्याग्रह कमिटीने आपणास महाडला बोलाविले आहे, ते महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिण्याकरिता बोलावले आहे, असा आपला समज होऊ देऊ नका. चवदार तळ्याचे पाणी प्याल्याने तुम्ही-आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही-आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता जावयाचे नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे. म्हणजे ही सभा समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी बोलाविण्यात आली आहे, हे उघड आहे.
नुसती भेटीबंदी किंवा लोटीबंदी गेली म्हणून अस्पृश्यता गेली असे मानण्याचा मूर्खपणा करून नका. या बाबतीत एक गोष्टी ध्यानात घेतली पाहिजे ती ही, की लोटीबंदी आणि भेटीबंदी उठल्याने समूळ अस्पृश्यता जात नाही. या दोहींमुळे फारफार तर घराबाहेरची अस्पृश्यता जाईल. पण घरातल्या अस्पृश्यतेला काही धक्का लागत नाही. दारातल्या अस्पृश्यतेबरोबर घरातली अस्पृश्यता आपणास घालवावयाची असल्यास बेटीबंदी उठविली पाहिजे. त्याशिवाय दुसरा इलाज नाही. दुसऱ्या दृष्टीने विचार केला तरी अखेर बेटीबंदीचा उठाव करणे हाच खरा समता प्रस्थापित करण्याचा मार्ग ठरतो. कोणासही कबूल करावे लागेल, की मुख्य भेद लोपला की पोटभेद आपोआप लोपतातच. पण पोटभेद लोपल तर मुख्य भेद लोपेलच असे मात्र होत नाही. रोटीबंदी, लोटीबंदी आणि भेटीबंदी हा साऱ्या बंद्या एका बेटीबंदीमुळे उद्भवल्या आहेत. ती उठली की बाकीच्यांना उठवण्याचा प्रयत्न करावयास नको, त्या आपोआप उठतातच.
माझ्या मते, बेटीबंदीचा बांध फोडणे ह्यातच खरे अस्पृश्यता निवारण आहे आणि त्यामुळे खरी समता प्रस्थापित होणार आहे. आपण जर अस्पृश्यता नष्ट करावयाची असेल तर अस्पृश्यतेचे मूळ बेटीबंदीत आहे हे आपण ओळखिले पाहिजे आणि आपला आजचा हल्ला जरी लोटीबंदीवर असला तरी त्याचा मारा अखेर बेटीबंदीपर्यंत भिडवला पाहिजे. त्याशिवाय अस्पृश्यता ही मुळासकट उपटली जाणार नाही.
हिंदू नर्सेसवर मोदींचा विश्वास नाही का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल
अस्पृश्यता निवारण करून समता प्रस्थापित करण्याचा हा जो कार्यभाग आपण शिरावर घेतला आहे, तो आपण तडीस नेला पाहिजे. आपल्याशिवाय इतरांच्या हातून हा कार्यभाग होणार नाही. आपला जन्म या कार्यासाठीच आहे, असे मानून ते करावयास लागणे, यातच आपल्या आयुष्याची सार्थकता आहे. हे पुण्य आपल्या पदरी पडत आहे, ते ओटीत घेऊ या.
हे कार्य जसे स्वहिताचे आहे तसेच हे कार्य राष्ट्रहिताचेही आहे. चातुर्वर्ण्यांतर्गत अस्पृश्यता नाहीशी झाल्याशिवाय हिंदू समाजाचा तरणोपाय नाही.
ज्या समाजक्रांतीचा आज येथे प्रारंभ होत आहे ती समाजक्रांती शांततेने घडून येवो अशी मी या ठिकाणी त्या जगन्नियंत्याची प्रार्थना करतो. ही समाजक्रांती शांततेने घडू देण्याची जबाबदारी आमच्यापेक्षा आमच्या प्रतिपक्षावर जास्त प्रमाणात आहे, याबद्दल कोणाला शंका घेता येणार नाही. ही समाजक्रांती अत्याचारी होईल किंवा अनत्याचारी होईल हे सर्वस्वी स्पृश्य लोकांच्या वागणुकीवर अवलंबून राहील.
१७८९ सालच्या फ्रेंच राष्ट्रीय सभेस अत्याचार केल्याबद्दल जे लोक दोष देतात, त्या लोकांना एका गोष्टीचा विसर पडतो. ती ही, की फ्रेंच राष्ट्रीय सभेला फ्रान्स देशातील राजाने कपटाने वागविले नसते, वरिष्ठ प्रजेने जर विरोध केला नसता, परकीयांची मदत घेऊन तिला दडपून टाकण्याचे पाप केले नसते तर तिला क्रांतीच्या कार्यात अत्याचार करावा लागला नसता आणि सर्व समाजक्रांती शांततेने पार पडली असती. आमच्या प्रतिपक्षासही आमचे सांगणे आहे, की तुम्ही आम्हाला विरोध करून नका. परकीय सरकारची अगर परधर्मीयांची मदत घेऊन आमच्यावर चढाई करू नका. शास्त्रांना झुगारून द्या, न्यायाला अनुसरा आणि आम्ही खात्री देतो, की हा कार्यक्रम आम्ही शांततेने पार पाडू.
ADVERTISEMENT