–इम्तियाज मुजावर, सातारा
ADVERTISEMENT
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचं आयुष्यच बदलून गेलं. कोरोना लॉकडाऊनच्या काळातच एका प्रेमवीराचं ब्रेकअप झालं. भेटीगाठी आणि संवादात दुरावा आल्यानं प्रेयसी दुसऱ्याच्याच प्रेमात पडली. त्यानंतर जे घडलं त्यामुळे त्याच्या प्रेमाची ब्रेकअप स्टोरी अगदी पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचली. प्रेमभंग झाल्याने चिडलेल्या प्रेमवीरांने चक्क प्रेयसीलाच पळवण्याचा प्रयत्न केला. यातूनच हाणामारी, पळवापळवी अन् जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
चित्रपटाची पटकथा वाटावी अशीच एक प्रेमभंगाची घटना साताऱ्यात घडली. या कहाणीमध्ये युवक व युवती यांच्या प्रेमाची सुरुवात साधारण तीन वर्षांपासून झाली होती. तो फलटण तालुक्यातील, तर ती सातारची. ती कॉलेजला, तो मात्र कमी शिकलेला पण कामावर जाणारा. आठवड्यातून तो किमान दोन वेळा तरी तिला भेटायला हमखास सातार्याला यायचा. मग प्रेमाच्या आणाभाका घेत कॅफे, हॉटेल करत अनेकदा यवतेश्वर घाट, कासची देखील सफर केली. लग्नाची स्वप्ने पाहून सगळं नियोजन सुरू झालं. प्रेम बहरात आलेलं असतानाच कोरोना आला.
झालं असं की कोरोनानंतर लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे दोघांच्या जवळपास थांबल्याच. सुरुवातीला कोरोना जाईल आणि पुन्हा जुने दिवस परततील असंच या प्रेमवीरांना वाटलं. याच आशेवर पुढचे 5 ते 6 महिने गेले.
त्यातच लॉकडाऊनमुळे प्रेमवीराचा कामही गेल्यानं त्याच्यावर मोठं संकट कोसळलं. दुसरीकडे प्रेयसीला भेटता येत नाही, याचं दुःख व्हायचं. दोघांमध्ये फोनवरून संवाद व्हायचा. मात्र, हळूहळू प्रेयसी कारणं द्यायला लागली. फोनवरील संवादही कमी होतं गेला. नंतर ती फोन, मेसेज करायचं टाळू लागली. त्यामुळे तरुण अधिक भावनिक झाला.
6 ते 8 महिन्यानंतर प्रेयसी पहिल्यासारखं बोलत नाही. मेसेज करत नसल्याची शंका आल्यानं त्याने वाद घातला. यावर प्रेयसीने हिसका दाखवत त्याची लायकी काढली. फोनवरील शब्दांच्या या फटकार्याने प्रेमवीर घायाळ झाला. लॉकडाऊनमध्येही शक्य होईल तसे भेटण्याचा प्रयत्न केला. वादविवादानंतर दोन-तीन भेटीही दोघांमध्ये झाल्या. मात्र, पॅचअप झालं नाही.
चौथ्या भेटीमध्ये मात्र तिने थेट ‘ब्रेकअप’चा पवित्रा घेतला. याचवेळी प्रेमवीराला मारहाण झाली. ही मारहाण करणारा तो युवक प्रेयसीचा मित्रच होता. यातूनच मग प्रेमवीराला गेल्या सहा महिन्यातील कमी बोलण्याचं नेमकं कारण उमगले. पण प्रेमवीराने हार न मानता प्रेयसीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रेयसी काही केल्या पॅचअपला तयार होत नव्हती.
प्रियकराने तिला भेटायला बोलावलं. भेटायला आलेल्या प्रेयसीला दुचाकीवरुन पळवलं. या गडबडीत मात्र प्रेयसी जायबंदी झाली आणि प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. पोलिसांनी जाबजबाब घेतल्यानंतर त्यांनाही नेमक्या ‘ट्विस्ट’चा अंदाज लक्षात आला. अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन प्रेमवीरावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
ADVERTISEMENT