शिवसेना पक्षप्रमाणेच ठाकरे घराण्यातही उभी फुट पडल्याचे चित्र आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तीनही मुलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळत आहेत. काही सदस्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे, तर काही सदस्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. मात्र या सगळ्यांच्या निमित्ताने कधीही बातम्यांमध्ये, चर्चांमध्ये नसणारे ठाकरे घराण्यातील अनेक नावं, चेहरे समोर आले आहेत. त्यामुळे या सर्व चेहऱ्यांची ओळख आणि त्यांच्या भूमिका जाणून गरजेचं आहे.
ADVERTISEMENT
प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई ठाकरे यांना पाच मुली आणि तीन मुलं.
-
मुली – पमा टिपणीस, सरला गडकरी, सुशिला गुप्ते, संजीवनी करंदीकर आणि सुधा सुळे.
-
मुलं – बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि रमेश ठाकरे.
1. प्रबोधनकार ठाकरे यांचे थोरले पुत्र बाळासाहेब ठाकरे :
बाळासाहेब ठाकरे यांचा विवाह सरला वैद्य यांच्याशी झाला. लग्नानंतर सरला यांचं नाव बदल्याने त्या मिनाताई ठाकरे झाल्या. बाळासाहेब-मिनाताई ठाकरे यांना तीन मुलं. थोरला बिंदुमाधव. दोन नंबरचा पुत्र जयदेव ठाकरे आणि सर्वात धाकटे उद्धव ठाकरे.
बिंदुमाधव ठाकरे –
बिंदुमाधव ठाकरे यांचा विवाह माधवी यांच्याशी झाला. बिंदुमाधव यांना बिंदा अशी टोपण नावानेही हाक मारली जायची. चित्रपट निर्माते म्हणून त्यांनी चांगली ओळख मिळविली होती. मात्र 1996 साली बिंदुमाधव यांचे अपघाती निधन झाले. बिंदुमाधव यांना दोन अपत्य आहेत. मुलगा निहार ठाकरे आणि मुलगी नेहा ठाकरे. निहार ठाकरे हे ख्यातनाम वकील असून त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. सोबतच ते सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचा खटलाही लढत आहेत. तर नेहा ठाकरे यांचा मनन ठक्कर यांच्याशी विवाह झाला आहे.
जयदेव ठाकरे –
जयदेव ठाकरे यांचे तीन विवाह झाले. पहिला विवाह जयश्री ठाकरे यांच्याशी झाला. या दोघांना जयदीप ठाकरे हा एक मुलगा. जयदेव ठाकरे यांचा दुसरा विवाह स्मिता यांच्याशी झाला. या दोघांना दोन मुलं. राहुल आणि ऐश्वर्य. तर त्यांचा तिसरा विवाह अनुराधा ठाकरे यांच्याशी झाला. या दोघांना अनुराधा ही एक मुलगी. यापैकी सध्या जयदेव आणि स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. तर जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला आहे.
उद्धव ठाकरे –
उद्धव ठाकरे यांचा १९८९ मध्ये रश्मी ठाकरे यांच्याशी विवाह झाला. उद्धव-रश्मी ठाकरे दोन मुलं. यात पहिला आदित्य ठाकरे तर दुसरा तेजस ठाकरे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. दोघेही आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद संभाळले आहे, तर आदित्य ठाकरे यांनी मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली आहे. तेजस ठाकरे हे वन्यजीव अभ्यासक आहेत. खेकड्यांची नवीन प्रजाती शोधण्याचे श्रेय त्यांना जाते.
2. प्रबोधनकार ठाकरे यांचे दुसरे पुत्र श्रीकांत ठाकरे :
श्रीकांत ठाकरे यांचा विवाह बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मिनाताई ठाकरे यांची बहिण कुंदा यांच्यासोबत झाला. श्रीकांत-कुंदा ठाकरे यांना दोन अपत्य. मुलगा स्वरराज आणि मुलगी जयवंती. स्वरराज यांचं नाव पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे असं बदललं.
राज ठाकरे –
राज ठाकरे यांचा विवाह शर्मिला वाघ यांच्याशी झाला. राज-शर्मिला ठाकरे यांना अमित हा एक मुलगा. राज आणि अमित ठाकरे हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे अध्यक्ष आहेत. तर अमित ठाकरे मनसेच्या वाढीसाठी कार्यरत आहेत. राज ठाकरे हे व्यंगचित्रकार देखील आहेत.
3. प्रबोधनकार ठाकरे यांचे तिसरे चिरंजीव रमेश ठाकरे :
रमेश ठाकरे हे अविवाहित होते. ते कधी राजकारणाच्या पटलावरही चर्चेत आले नाहीत. १९९९ साली वयाच्या ६० व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
ADVERTISEMENT