स्मिता शिंदे, शिरुर (पुणे)
ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेलीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिरूर शहरातील अनेक नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोस्टाद्वारे हे पत्र आले असून या पत्रात उद्योजक प्रकाश धारिवालांसह नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहे.
या पत्रात आमदार अशोक पवार यांचा महेंद्र मल्लाव करण्याची धमकी देण्यात आली असून काही वर्षापूर्वी जसे शिरुर नगरपालिकेचे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची भर चौकात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती तसंच आमदार अशोक पवार यांनाही भर चौकात जीवे मारण्याची भाषा या पत्रात वापरण्यात आली आहे.
दरम्यान, अशाप्रकारच्या पत्राने तालुक्यातील राजकारणात तीव्र पडसाद उमटले असून लोकप्रतिनिधींबाबत जर अशी भाषा वापरली जात असेल तर लोकप्रतिनिधीनी कामे कशी करायची? असा सवालही विचारला जात आहे. दुसरीकडे या प्रकरणी पोलीस प्रशासनाने या पत्राची गंभीर दखल घ्यावी. अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी केली आहे.
दरम्यान, या निनावी पत्रात आमदार अशोक पवार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. अशोक पवार यांनी भूखंड लाटला असून विकासकामांधील अनेक कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
दुसरीकडे या पत्रात असाही दावा करण्यात आला आहे की, आमदार पवार यांच्या पत्नी देखील नगरपालिकेच्या कामांमध्ये लुडबूड करत आहेत. नगरपालिकेत येऊन त्या थेट नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या मीटिंग घेत आहेत. त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा सवालही आता विचारला जात आहे.
खासदार नवनीत राणा यांना शिवसेनेच्या लेटरहेडवर जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांना धमकी देणारं आणि जाब विचारणाऱ्या या निनावी पत्राची सध्या शिरुर आणि परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, या पत्राबाबत आता शिरुर पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असून गृहखातं देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. अशावेळी आता त्यांच्या पक्षातील आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने आता पक्ष पातळीवर याबाबत कशी दखल घेतली जाणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT