“उद्धव ठाकरे, तुम्ही हिंदुत्व फक्त सोडलंच नाही, तर…”; भाजपने वाचली यादी

मुंबई तक

28 Mar 2023 (अपडेटेड: 28 Mar 2023, 10:30 AM)

उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत असं आवाहन केलं होतं की, हिंदुत्वापासून दूर गेल्याची एकतरी घटना दाखवून द्या. ठाकरेंच्या याच विधानावर भाजपने बोट ठेवले आहे. भाजपकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून, घटनांची यादी वाचत भाजपने ठाकरेंना सुनावलं आहे.

bjp slams uddhav thackeray over hindutva says you gone away from hindutva

bjp slams uddhav thackeray over hindutva says you gone away from hindutva

follow google news

Uddhav Thacekray vs Bjp: उद्धव ठाकरेंच्या मालेगावातील सभेनंतर भाजपने पलटवार केला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत असं आवाहन केलं होतं की, हिंदुत्वापासून दूर गेल्याची एकतरी घटना दाखवून द्या. ठाकरेंच्या याच विधानावर भाजपने बोट ठेवले आहे. भाजपकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून, घटनांची यादी वाचत भाजपने ठाकरेंना सुनावलं आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्र भाजपकडून एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडीओत उद्धव ठाकरेंच्या मालेगावातील सभेतील भाषणाचा संदर्भ असून, त्यावरून टीका करण्यात आली आहे.

भाजपने म्हटलं आहे की,”उद्धव ठाकरेंना सत्ता गेल्याबरोबर अनेक जुन्या गोष्टींची ओढ लागली आहे. अडीच वर्षे त्यांना मुंबईतील निवासस्थान सोडून महाराष्ट्रातील जनतेमध्ये जाणे गरजेचे वाटले नाही. पण, सत्ता गेली. पक्षाचं नाव आणि चिन्ह गेले तसे खडबडून जागे होत महाराष्ट्रभर सभा घेण्यास सुरुवात केली. घरबशा माणसाने घराबाहेर पडणे सकारात्मक असले, तरी त्यांच्या भाषणांमध्ये नाविन्यपूर्ण काहीच नाही.”

हेही वाचा – शरद पवार उद्धव ठाकरेंच्या बाजूने, राहुल गांधींना सुनावलं!

“नेहमीसारखी सहानुभूती मिळवण्याची केविलवाणी धडपड. पक्षातील लोकांनी उद्धव ठाकरेंच्या वागणुकीला, बदललेल्या भूमिकेला कंटाळून पक्ष सोडल्याने त्यांच्यात आलेली उद्विग्नता हे त्यांच्या भाषणाचे सार असते. मालेगावच्या सभेत त्यांनी आवाहन करत विचारलं की, मी हिंदुत्वापासून दूर झालोय अशी एक घटना तरी दाखवून द्या. या आवाहनानंतर त्यांना त्यांच्या सत्ताकाळात हिंदुत्वापासून ते दूर गेल्याच्या घटनांचा साक्षात्कार करणे आवश्यक आहे”, असं म्हणत भाजपने घटना सांगितल्या आहेत.

पालघर हत्याकांड ते राणांना अटक; कोणते आरोप करण्यात आले?

“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांसमोर पालघरच्या साधूंचा निर्घृण खून करण्यात आला. कोरोनाच्या निमित्ताने सर्व हिंदू सणांना निर्बंध लावण्यात आले, पण ईद वेळी हे निर्बंध मूक संमतीने एक प्रकारे शिथील करण्यात आले होते. कारण तेव्हा बाजार फुलले होते. ईदसाठी बाहेर पडलेल्यांवर कुठलीही कारवाई होत नव्हती”, असा आरोप भाजपने केला आहे.

पुढे म्हटलं आहे की, “त्या काळात संजय राऊतने कोरोना काळ होईपर्यंत राम मंदिराचं काम थांबवावं असा सल्लाही दिला होता. राम मंदिर भूमिपूजनाचं औचित्य साधून अनेक ठिकाणी लोकांनी आरत्या करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची धरपकड करण्यात आली. मुंबई उद्धव सेनेने अजान पठण स्पर्धा भरवल्या. विभागप्रमुख सकपाळने तर अजान ही महाआरतीसारखी आहे, असं वक्तव्य केलं.”

शरजील उस्मानीला मोकाट जाऊ दिले – भाजप

“मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राणा दाम्पत्याला राजद्रोहाच्या कलमाखाली अटक करून जेलमध्ये धाडण्यात आले. हिंदूंचा क्रूर छळ करणाऱ्या औरंग्याच्या कबरीला संरक्षण दिले गेले. पुण्यात हिंदूंना सडका समाज बोलणाऱ्या शरजील उस्मानीला मोकाटपणे जाऊ दिले गेले”, असा आरोप भाजपने केला आहे.

हेही वाचा – ‘सावरकरांच्या आडून अडाणी गौरव यात्रा’, संजय राऊत शिंदेंसह भाजपवर बरसले

“उद्धव ठाकरे, तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर आता देव वाटू लागले, कारण तुमची सत्ता गेली. पक्ष तुम्हाला सोडून गेला. पण, महाविकास आघाडीची सत्ता नशा असल्यापासून राहुल गांधी सावरकरांवर अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य करतो. पण तुम्हाला त्यावर एकदाही बोलावं वाटलं नाही. उद्धवराव, एक नाही तर अशा अनेक घटना आहेत. जिथे स्पष्टपणे दिसलं की, तुम्ही हिंदुत्व फक्त सोडलंच नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खूश करण्यासाठी, खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही हिंदू विरोधी वागलात”, अशी टीका भाजपने उद्धव ठाकरेंवर केली आहे.

शिवसेना हा कधीही फक्त राजकीय पक्ष नव्हता, तर… -भाजप

शिवसेना हा कधीही फक्त राजकीय पक्ष नव्हता. शिवसेना स्व. बाळासाहेबांचा विचार होता, ज्याच्याशी तुम्ही सत्ता लालसेपोटी प्रतारणा केली. तो विचार घेऊन शिवसैनिक बाजूला पडले आणि महायुती सरकारमध्ये आले. तुम्ही एका समुदायाचं लांगुचालन करण्याच्या नादात आता हिंदुत्ववादी सुद्धा राहिला नाहीत. मी हिंदूत्वापासून गेलो अशी घटना दाखवून द्या असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर आली, ती तुमच्या हिंदूविरोधी गैरकृत्यामुळे”, अशी टीका भाजपने केली आहे.

    follow whatsapp