नाशिक: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करायाला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी नाशिकमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांना सारखीच मतं कशी मिळाली? असा सवाल करताना त्याची आकडेवारी जाहीर केली. महायुतीने नाशिक जिल्ह्यात जिंकलेल्या 12 आमदारांची नावं व त्यांना मिळालेली मतं उघड केली आहे. त्यामुळं आता यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. (evm controversy how did 12 mla get the same number of votes rohit pawar showed the list)
ADVERTISEMENT
रोहित पवारांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की,
गुजराती #EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का?
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो.
हे ही वाचा>> Maharashtra New CM: भाजपचं ठरलं, 'या' नावावर होणार शिक्कामोर्तब... शिंदेंचा पत्ता कापला जाणार?
निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं? काय खोटं? हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत.
तरी आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल, अशी अपेक्षा व्यक्त करताना रोहित पवारांनी आकडेवारी देखील पोस्ट केलीय.
ज्यामध्ये नांदगावमधून जिंकलेल्या सुहास कांदेंना १,३८,०६८ मतं, सिन्नरमधून जिंकलेल्या माणिकराव कोकाटेंना १,३८,५६५ मतं, दिंडोरीतून जिंकलेल्या नरहरी झिरवाळ यांना १,३८,६२२ मतं आणि येवल्यातून विजय मिळवलेल्या छगन भुजबळांना १,३५,०२३ मतं मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे.
इगतपुरीतून जिंकलेल्या हिरामण खोसकरांना १,१७,५७५ मतं, कळवणमधून जिंकलेल्या नितीन पवारांना १,१९,१९१ मतं, निफाडमधून जिंकलेल्या दिलीप बनकरांना १,२०,२५३ मतं मिळाल्याचं दाखवण्यात आलंय.
हे ही वाचा>> Amol Mitkari Vs Naresh Arora : अजितदादांच्या खांद्यावर 'नरेश अरोरांचा' हात, मिटकरींचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, काय आहे वाद?
याशिवाय नाशिक पूर्वेतून जिंकलेल्या राहुल डिकलेंना १,५६,२४६ मतं, मालेगाव बाह्यमधून जिंकलेल्या दादा भुसेंना १,५८,२८४ मतं आणि बागलाणमधून जिंकलेल्या दिलीप बोरसेंना १,५९,६८१ मतं मिळाल्याचं दाखवण्यात आलंय.
इतकंच नाही तर नाशिक मध्यतून जिंकलेल्या देवयानी फरांदेंना १,०५,६८९ तर चांदवडमधून जिंकलेल्या राहुल आहेर यांना १,०४,८२६ मतं मिळाली आहे.
निकाल लागल्यानंतर अनेक ठिकाणी झालेली मतांमध्ये आणि मोजलेल्या मतांमध्ये तफावत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे. राज्यातील हाय-होल्टेज लढतींच्या ठिकाणीही अशा तक्रारी येत असल्याने आता यावर निवडणूक आयोग काय स्पष्टीकरण देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
ADVERTISEMENT