Ashok Chavan Latest News : राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्यापूर्वीच काँग्रेसला लागोपाठ झटके बसत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली. दरम्यान, अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्याची कारणे समोर आली आहेत. त्यांनीच याबद्दल भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 'लोकमत'या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यात त्यांनी काँग्रेस सोडण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे.
नाना पटोलेंच्या नेतृत्वावर टीका
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर टीका केली आहे. चव्हाण म्हणाले, "निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणतीही तयारी पक्षात दिसत नव्हती. प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे ऐकून पुढे जायचे असते. लोकसभेची लढाई आपण जिंकणार कशी, असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला होता."
"त्यादृष्टीने चर्चा, अंमलबजावणी होत नव्हती. राजकीय व्यवस्थापन दिसत नव्हते. आताची वेळ ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची, लोकांचे प्रश्न तडीस लावण्याची असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण वगैरे चालले होते. या सगळ्या कार्यशैलीबद्दल मी बोललो, सूचना केल्या पण त्यांची दखल घेतली गेली नाही. शेवटी किती वाट पाहायची? टीमवर्क दिसत नव्हते", असे म्हणत अशोक चव्हाण यांनी थेट नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.
... म्हणून काँग्रेस सोडली -चव्हाण
पक्षात बदल घडवून आणण्याऐवजी पक्ष का सोडला? या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, "खूप उशीर झालेला होता. सांगून अर्थ नाही, असे मला वाटले. काही चांगले बदलच दिसत नव्हते. साचेबद्धपणा आलेला होता. किती वर्षे अशीच वाट पाहायची? किती कोंडी होऊ द्यायची?", असा प्रश्न उपस्थित करत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्यामागची भूमिकाही मांडली.
ADVERTISEMENT