कामाची बातमी: PAN 2.0 हे नवं पॅन कार्ड आहे तरी काय, सरकारला का करावं लागलं लाँच?
PAN 2.0: भारत सरकारने नुकतंच नवीन पॅन कार्ड लाँच केलं आहे. याबाबत सरकारचा नवा नियम काय आहे याबाबत सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

New Pan Card: मुंबई: भारत सरकारने नुकतंच 'पॅन 2.0' लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. हे नवीन पॅन कार्ड जुन्या म्हणजेच आतापर्यंत चालत असलेल्या परंपरागत पॅनकार्डपेक्षा प्रगत आणि आधुनिक असणार आहे. यामध्ये डिजिटल क्यूआर कोड, जलद पडताळणी प्रक्रिया यासोबतच सायबर सुरक्षेकडे अधिक लक्ष देणाऱ्या प्रक्रिया समाविष्ट केल्या गेल्या आहेत. मात्र, या नवीन सुविधेसोबतच ऑनलाईन होत असलेल्या फसवणूकीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे.
'पॅन 2.0' हे भारत सरकारने वित्तीय सुरक्षेच्या दृष्टीने उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे वित्तीय सुरक्षा अधिक मजबूत होणार असून डिजिटल इंडिया या संकल्पनेलासुद्धा वाव मिळणार आहे. जर तुमच्याकडे तुमचं पॅन कार्ड असेल तर ते लवकरात लवकर अपडेट करुन घेणं गरजेचं आहे.
हे ही वाचा>> PAN 2.0 : नव्या जमन्याचं नवं पॅनकार्ड, QR कोडचा काय उपयोग होणार? घरबसल्या कसा कराल अर्ज?
काय आहे पॅन 2.0?
पॅन 2.0 हे आतापर्यंत चालत असलेल्या पॅन कार्डचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. यामध्ये काही खास आणि आधुनिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
डिजिटल क्यूआर कोड: डिजिटल क्यूआर कोडमुळे कोणत्याही व्यक्तीच्या पॅन तपशीलांची किंवा डिटेल्सची जलद पडताळणी करणे शक्य होईल.
रिअल टाइम अपडेट: टॅक्सपेयर्सना सुद्धा आपले डिटेल्स लगेचच अपडेट करण्याची सुविधा प्राप्त होईल.
फ्रॉड- प्रूफ डिझाइन: बनावट किंवा खोटे पॅन कार्ड बनवण्याला आळा घालण्यासाठी यामध्ये हाय-सिक्योरिटी फीचर्स जोडण्यात आली आहेत.
पॅन 2.0 ची गरज का पडली?
गेल्या काही वर्षांत पॅन कार्ड फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये बनावट पॅन कार्ड तयार करून आर्थिक गुन्हे करण्यात आले आहेत. हे थांबवण्यासाठी सरकारने पॅन कार्ड अधिक सुरक्षित आणि त्यात डिजीटल सुविधांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बनावट पॅन कार्डच्या वाढत्या घटना: बरेच लोक आपली खोटी ओळख सांगून बनावट पॅन कार्ड वापरत होते, यामुळे करचोरी आणि बँकिंग फसवणूक होत होती.
हे ही वाचा>> PAN Card: पॅन कार्ड बनवणं आहे खूप सोप्पं, पण 'एवढे' पैसे मात्र...
डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षितता: डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत, ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित करण्याची गरज भासू लागली.
तंत्रज्ञानाचा वाढता वापर: डिजिटल पडताळणी सोपी करण्याची आणि बायोमेट्रिक ओळख पॅनशी जोडण्याची गरज होती.
सरकारी योजनांचे फायदे: विविध सरकारी योजनांचे फायदे मिळविण्यासाठी, पॅन कार्ड आवश्यकता अधिक पारदर्शक करणे आवश्यक होते.
पॅन 2.0 च्या नावावर फसवणूक कशी होत आहे?
दिल्लीतील रोहित राठोड (काल्पनिक नाव) यांना काही दिवसांपूर्वी एक व्हॉट्सअॅप मेसेज आला ज्यामध्ये दावा केला होता की, त्यांना त्यांचा 'पॅन 2.0' अपडेट करावा लागेल नाहीतर त्यांचा जुना पॅन निष्क्रिय केला जाईल.
मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली होती. त्यावर क्लिक केल्यावर त्यांना एक फॉर्म भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी त्याचे वैयक्तिक डिटेल्स (नाव, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, ओटीपी) टाकल्यानंतर, त्याच्या बँक खात्यातून 50,000 रुपये कापले गेले. नंतर तपासात असे आढळून आले की ती एक बनावट वेबसाइट होती, जी सायबर गुन्हेगारांनी सरकारी वेबसाइटसारखी बनवली होती.
या फसवणूकीपासून कसं दूर राहायचं?
फक्त सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून अपडेट करा: कोणतेही बदल फक्त NSDL किंवा UTIITSL च्या अधिकृत वेबसाइट वरुन करा.
अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका: व्हॉट्सअॅप, ईमेल किंवा एसएमएसवर आलेली कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी काळजी घ्या.
बँकेशी तात्काळ संपर्क साधा: जर फसवणूक झाली तर ताबडतोब तुमच्या बँकेला आणि सायबर सेलला कळवा.
कोणाशीही OTP शेअर करू नका: कोणतीही सरकारी संस्था तुम्हाला फोनवर OTP किंवा इतर वैयक्तिक माहिती विचारणार नाही.
तक्रार कुठे करावी?
पॅन 2.0 च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी सामान्य लोकांना फसवण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. अशा परिस्थितीत, दक्षता आणि जागरूकता हेच सर्वात मोठे संरक्षण आहे. जर तुम्हीही अशा कोणत्याही प्रकारच्या फसवणूकीला बळी पडला असाल तर ताबडतोब cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा.
नवीन पॅन कार्डच्या नावाखाली, अनेक सायबर गुन्हेगार बनावट वेबसाइट आणि ईमेलद्वारे लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्हाला कोणत्याही अज्ञात लिंकवरून नवीन पॅन कार्ड अपडेट करण्याचा संदेश आला तर प्रथम त्याची सत्यता तपासा. पॅन 2.0 साठी फक्त अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करा.