महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? जयंत पाटलांनी घेतली बावनकुळेंची भेट, वाचा Inside स्टोरी
जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची एक भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) नेते जयंत पाटील यांची बावनकुळे यांच्या सरकारी निवासस्थानी काल (24 फेब्रुवारी) रात्री 8 वाजता भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या भेटीवेळी मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित असल्याचं बोललं जात आहे.
आधी बावनकुळे यांच्याकडून मंत्रालयात जयंत पाटील यांना वेळ देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी ठिकाण बदलण्यात आणि त्यांना बंगल्यावर बोलावण्यात आलं. दरम्यान, या भेटीनंतर जयंत पाटील आज हिंगोली-नांदेड दौऱ्यासाठी रवाना झाले.
'मी जयंत पाटलांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावं एवढा मोठा नाही'
दरम्यान, याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा या भेटीबाबत विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, 'जयंत पाटील काल सांगली जिल्हा आणि त्यांच्या जिल्ह्यातील महसुली खात्याशी संबंधित काही विषयाला घेऊन भेट घेण्यासाठी आले होते. विखे-पाटील सोबत होते. 14 ते 15 विषय महसूल विभागाशी संबंधित असल्यानं भेट झाली.'
हे ही वाचा>> Thane : आईनंच घेतला 17 वर्षाच्या दिव्यांग लेकीचा जीव, आजीच्या मदतीनं लावली मृतदेहाची विल्हेवाट, प्रकऱण काय?
'सांगली जिल्ह्याच्या विकास कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. त्यांना मी आश्वासन दिले येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या 14 समस्या संदर्भात बैठक माझ्या दालनात लावून सोडवणार आहे.'
'काल संध्याकाळी साडे आठ ते नऊ दरम्यान माझे अधिकृत बंगल्यावर ही भेट झाली तेव्हा 400 ते 500 लोक त्या ठिकाणी होते. ही राजकीय भेट नव्हती. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही फक्त विकास कामांची चर्चा झाली.'
हे ही वाचा>> Indrajit Sawant : "तुमचे महाराज पळून गेले होते..." इंद्रजित सावंत यांना धमक्या देताना, शिवरायांबद्दल संतापजनक वक्तव्य
'जयंत पाटील यांनी काल कुठलीही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावं एवढा मोठा नाही.' असं बावनकुळे यावेळी म्हणाले.
'एखाद्या मंत्र्याला भेटणे हे काही गैर नाही..', जयंत पाटलांकडून स्पष्टीकरण
'राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, अशा अर्धवट बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहेत.'
वास्तविक मी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांच्या बद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. यामध्ये आष्टा येथील ४,६,९ जमिनींचे प्रश्न, आष्टा अप्पर तहसील कार्यालय इमारत प्रश्न, चांदोली वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न, जमिनीवरील शेऱ्यांचे प्रश्न, सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूसंपादनाचे प्रश्न अशा विविध प्रश्नांचा समावेश होता. श्री. बावनकुळे यांनी संध्या. ६ ची वेळ दिली होती. मात्र ते सुनावणीमध्ये असल्याने त्यांना यायला उशीर झाला. त्याच वेळी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्यांच्या काही कामानिमित्ताने बावनकुळे यांना भेटायला आले असल्याने तिथे उपस्थित होते.
कालच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. विधानसभा सदस्य म्हणून एखाद्या मंत्र्याला त्यांच्या विभागाच्या कामासंदर्भात भेटणे हे काही गैर नाही. तरीही प्रसारमाध्यमे अशा प्रकारच्या बातम्या बनवितात हे खेदजनक आहे. अशी पोस्ट सोशल मीडियावर जयंत पाटलांनी शेअर करत या भेटीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.