Pune Rape Case: "आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्री...", विजय वडेट्टीवारांचा योगेश कदमांवर हल्लाबोल!
Vijay Wadettiwar On Yogesh Kadam : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळं संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून फरार आरोपी दत्तात्रेय गाडेचा शोध सुरु आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुणे बलात्कार प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा योगेश कदमांवर हल्लाबोल

"स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय ? आरोपीला..."

विजय वडेट्टीवार ट्वीटरवर नेमकं काय म्हणाले?
Vijay Wadettiwar On Yogesh Kadam : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळं संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून फरार आरोपी दत्तात्रेय गाडेचा शोध सुरु आहे. "जिथे घटना घडली, तिथे कोणतीही हाणामारी, फोर्सफुल कृती घडलेली नाही. जे काही घडलं आहे, ते अतिशय शांततेने घडलं आहे. त्यामुळे तिथे आरडाओरड, हाणामारी असं काहीच घडलं नाही. घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजूबाजूला 10 ते 15 लोक होते. त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा या घटनेच्या खोलात पोहचून ज्यावेळी आरोपी आपल्या ताब्यात येईल, तेव्हा माहिती मिळेल", अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली होती. अशातच काँग्रेसचे नेते आणि माजी विरोक्षी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटरवर मंत्री योगेश कदम यांच्यावर सडकून टीका केलीय.
विजय वडेट्टीवार ट्वीटरवर काय म्हणाले?
पुणे- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय ? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्याकडून आरोप का? स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजून आरोपी पकडला नाही, तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लिनचीट देत आहेत? स्वारगेटमध्ये बलात्कार झाला आणि या मंत्र्यांच्या मते त्या मुलीने विरोध केला नाही, म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलत आहे. विधान करताना मंत्र्यांनी थोडी लाज शरम बाळगली पाहिजे.
हे ही वाचा >> Eknath Shinde: "नराधम कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर...", पुणे बलात्कार प्रकरणावर DCM शिंदेंचं मोठं विधान!
आरोपीला शोधण्याऐवजी पीडित मुलीला दोष देऊन सिद्ध काय करायचं आहे? आरोपीला क्लिनचीट देण्यासाठी मंत्र्यांची इतकी घाई का आहे? राज्यातील महिलांना लाडक्या बहिण म्हणून मिरवणाऱ्या युती सरकारची नियत इतकी खालच्या स्तरावरची असताना महिलांना सुरक्षित कसे वाटेल? आरोपी हा सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असल्याचे माहिती होताच महायुती मंत्रिमंडळाकडून आता बलात्कारी आरोपीची बाजू घेऊन त्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे का? असा सवाल उपस्थित करत विजय वडेट्टीवार यांनी योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल केला.
हे ही वाचा >> Vasant More : वसंत मोरेंना थेट मातोश्रीवरुन फोन, स्वारगेटवर तोडफोड केल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
"मुख्यमंत्री स्वत: त्यामध्ये लक्ष घालून आहेत. अजितदादा लक्ष देत आहे. मी स्वत: पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो. यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिल्या आहेत. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत अटक होईल. त्याचे सगळे लागेबांधे आहेत, ते पोलिसांच्या हाती आले आहेत. अशाप्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील, तर त्यात कुणालाही सोडलं जाणार नाही. त्यांची खैर केली जाणार नाही. अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल. अशाप्रकारचं सरकारचं धोरण आणि भूमिका आहे", असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.