'मी कोणताही पक्ष बदललेला नाही', अजित पवार अचानक असं का म्हणाले?
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरद्वारे एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसंच विरोधकांना टोलाही लगावला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'लाडकी बहीण' योजनेबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य
महिला सक्षमिकरणासह सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्याचा शासनाचा प्रयत्न
NCP : Ajit Pawar : लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय घटना घडामोडींना वेग आला आहे. सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसत आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नव्या वक्तव्याची खूप चर्चा होत आहे. “राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही." असं ते म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरद्वारे एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसंच विरोधकांना टोलाही लगावला आहे. ते म्हणाले, राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे.”
हेही वाचा : Team India: 'आली रे आली टीम इंडिया आली', जंगी स्वागतासाठी दणक्यात तयारी!
अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर अजित पवार नेमकं काय म्हणाले?
"माझ्या महाराष्ट्रवासियांनो, मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला. तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच, राज्याचा अशा प्रकारचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जाणार आहे. या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी 46 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे." असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.
हे वाचलं का?
'लाडकी बहीण' योजनेबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य
"आजवर आपण पाहत आलोय की, प्रत्येक कुटुंबातील आई स्वत:वरील खर्चात शक्य तितकी काटकसर करते. पण आपल्या मुलाबाळांना काही एक कमी पडणार नाही याची काळजी ती घेत असते. परंतु काही वेळा परिस्थितीच अशी निर्माण होते की, आर्थिक अडचणींमुळे घरातील मुलांकडे जास्त लक्ष दिले जात आणि नेमके मुलींकडे दुर्लक्ष होते. मात्र आता मला आशा आहे की, माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसहाय्यामुळे राज्यातील माता भगिनींची ही विवंचना निश्चित दूर होईल.
हेही वाचा : मुंबई Tak Impact: लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून लाच, तलाठ्यावर कारवाई!
त्या आर्थिक दृष्ट्या अधिक सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील. माझी मनस्वी इच्छा आहे की राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक, सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावी स्वत:च्या पायावर उभी राहावी. कुठल्याही महिलेला असं वाटू नये की, आपल्या दैनंदिन गरजांसाठी वडील, भाऊ किंवा नवऱ्यावर अवलंबून आहोत. त्यामुळेच ज्यावेळी माझी लाडकी बहीण या योजनेचा विचार करतो, तेव्हा मलाही ही योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकण्यात आलेले अत्यंत क्रांतिकारी पाऊल वाटते. आमच्या सरकारने आपल्या अनुभवाच्या जोरावर हे अशक्य वाटणारं काम शक्य करुन दाखवलं आहे.
ADVERTISEMENT
महिला सक्षमिकरणासह सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्याचा शासनाचा प्रयत्न
"एवढंच नाही तर, राज्यातील माता भगिनींनी पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे राहणार नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी इतर अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत. अर्थसंकल्पात राज्यात 25 हजार नवीन उद्योगांच्या उभारणीसाठी देखील आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी 30 टक्के युनिटमध्ये महिला उद्योजकांना साहाय्य केलं जाणार आहे. महिलांना पिंक ई-रिक्षा चालविण्यास सक्षम बनवलं जाणार आहे. याशिवाय शाळा-कॉलेजांमध्ये शिकणाऱ्या मुलींना देखील मोफत शिक्षण दिले जाणार आहे. आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे युवा कार्यप्रशिक्षण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील तरुण-तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण आणि सोबतच 10 हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड दिला जाईल.
ADVERTISEMENT
महिला, तरुण, तरुणींच्या सक्षमीकरणाच्या बरोबरीनं राज्याच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा जपण्याचा आणि पुढे नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. पंढरपूर वारीला जागतिक नामांकन मिळावं यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणे, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये देणे असे अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत.
हेही वाचा : एका कुटुंबातील किती महिलांना मिळणार 1500 रुपये?, फडणवीसांची मोठी घोषणा
"राज्यातील वारकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणं आणि वारकरी सांप्रदायची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे नेणं यासाठी मी आणि राज्य शासन बांधिल आहे. तुम्ही पाहिलं असेलच की अनेक नकारात्मक, निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करतात, त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जातंय. काहींकडून या बजेटला ‘लबाडाच्या घरचं आवतान’ आणि अजूनही बरीच नावं ठेऊन हिणवलं जातंय.
मला फक्त इतकंच सांगायचंय की या लोकांमध्ये आणि तुमच्या अजित दादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आणि तुमचा दादा काम करणारा आहे. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे. मी जे काही करतो, त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो. याचाच विचार माझ्या डोक्यात कायम सुरु असतो.”, असे अजित पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT