Ajit Pawar: 'सुरेश धसला काय वाटतंय याच्याशी मला काही घेणं-देणं नाही', अजितदादा चिडले
Ajit Pawar vs Suresh Dhas: सुरेश धस यांना काय वाटतं याच्याशी मला काही देणंघेणं नाही. असं म्हणत अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT

Ajit Pawar: मुंबई: मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांची भेट घेतली होती. तसेच त्यांना काही कागदपत्रंही सुपूर्द केली. ज्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी अजित पवारांवरील दबाव वाढला आहे. अशातच आज (28 जानेवारी) माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी बराच संताप व्यक्त केला. (i have nothing to do with what suresh dhas thinks ajit pawar got angry see what he said about dhananjay munde resignation)
जेव्हा अजित पवारांना भाजप आमदार सुरेश धस यांच्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा ते अधिकच संतापल्याचे दिसून आले.
हे ही वाचा>> Dhananjay Munde : "देवेनभाऊ आणि अजितदादांनीच उत्तर द्यावं...", दमानियांच्या आरोपानंतर काय म्हणाले मुंडे?
'सुरेश धसला काय वाटतंय मला काही त्याच्याशी घेणं-देणं नाही. मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित काम करावं त्यामध्ये एकनाथ शिंदेंचीही महत्त्वाची भूमिका आहे.'
'आम्ही निर्णय घेताना प्रमुख लोकं बसतो आणि निर्णय घेतो. वेगवेगळ्या पक्षातील खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही.' असं म्हणत अजित पवारांनी सुरेश धसांवरच निशाणा साधला.
अजित पवार नेमकं काय म्हणाले..
प्रश्न: अंजली दमानिया यांनी तुमची भेट घेतली याबाबत काय सांगाल
अजित पवार: अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रं माझ्याकडे दिली.. मी ती कागदपत्रं घेतली ती पाहिली.. कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना नागपूरला जायचं होतं. त्यामुळे मी आज त्यांची त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन भेट घेतली. ते म्हणाले की, तुम्हाला जशा अंजली दमानिया भेटल्या तशा मला पण भेटल्या. मला पण त्यांनी काही कागदपत्र दिली आहेत. मी म्हटलं की, तुम्ही काय केलंय?
तर ते म्हणाले की, तीन चौकशी चालू आहे. काय वस्तुस्थिती पुढे येते त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी ठरतील.
हे ही वाचा>> Anjali Damania : "धनंजय मुंडेंचा राजीनामा...", अजित पवार यांच्या भेटीनंतर दमानिया काय म्हणाल्या?
आम्ही पहिल्यापासून सांगतोय.. जी काही घटना बीडमध्ये घडली आहे सरपंचांच्या बाबतीत जी काही चौकशी सुरू आहे. त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये जर कुणाची नावं आली तर कारवाई केली जाईल. परंतु जर कोणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही.
संबंध असेल तर निश्चितपणे कोणाला पाठिशी घातलं जाणार नाही. हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि माझीही आहे.
प्रश्न: तुमच्यावरही जेव्हा आरोप झाले होते तेव्हा तुम्ही देखील राजीनामा दिला होता, तर धनंजय मुंडेंचा अद्यापही राजीनामा का नाही?
अजित पवार: माझी गोष्ट वेगळी आहे.. जी काही घटना घडली होती. ते पाहिल्यानंतर मला ते असह्य झालं म्हणून मी राजीनामा दिला. आता चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये दोषी आढळेल त्याला पाठिशी घातलं जाणार नाही. कारवाई होईलच.
प्रश्न: सुरेश धस म्हणतात की, धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का घ्यावा? अजित पवारांनी घेतला पाहिजे, त्यांना ते मान्य पाहिजे.
अजित पवार: सुरेश धसला काय वाटतंय मला काही त्याच्याशी घेणं-देणं नाही. मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित काम करावं त्यामध्ये एकनाथ शिंदेंचीही महत्त्वाची भूमिका आहे.
आम्ही निर्णय घेताना प्रमुख लोकं बसतो आणि निर्णय घेतो. वेगवेगळ्या पक्षातील खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही.
भाजपची जी भूमिका असेल त्याबाबत आम्हाला अमित शाहाजी, नड्डाजी, देवेंद्रजी, चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील.
नेते मंडळी नाही... खालचे कार्यकर्ते आरोप करत आहे. नेते मंडळीशी मी संपर्कात आहे. तुम्ही कोणाला नेते समजता ते मला माहीत नाही. मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत. तुम्ही ज्यांना नेते समजता ते पक्षाचे नेते नाहीत.
प्रश्न: नाना पटोले, सुप्रिया सुळे म्हणत आहेत की, नैतिकतेच्या आधारावर अनेक जणांनी राजीनामा दिला आहे. या सरकारमध्ये नैतिकता राहिली नाही म्हणून ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीत.
अजित पवार: आमचा सरकारमध्ये नैतिकता आहे की नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे बाकिच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही.
मी वरिष्ठ पातळीवरील सर्व मान्यवरांशी संपर्क ठेवून आहे. त्यामुळे जर कोणाची नावं घेऊन हा असं बोलतो तो तसं बोलतो.. मी तुम्हाला सगळे खालचे लोकं काय म्हणतात त्याबद्दल उत्तरं द्यायला बांधील नाही.
मी आज दुपारी अनेक विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यामध्ये हा पण विषय होता. या विषयाच्या संदर्भात सगळ्या काही चौकशी सुरू आहेत.