मूड ऑफ द नेशन: महाराष्ट्रात मविआचं काही खरं नाही, सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे
मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार आज लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीला बरंच चांगलं यश मिळालं होतं. तर भाजपला काहीसा फटका बसला होता. मात्र, तरीही देशात आपली सत्ता आणण्यात त्यांना यश आलं. पण त्यांना अपेक्षित असलेलं यश या निवडणुकीत मिळालं नाही. पण आता अवघ्या वर्षभराच्या आतच देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेचा मूड हा पुन्हा एकदा बदलला आहे. विशेषत: महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजप आणि एनडीएच्या बाजूने मतदान करू शकते असा अंदाज सर्व्हेतून समोर आला आहे. इंडिया टुडे ग्रुप- CVoter च्या Mood of the Nation (MOTN) सर्वेक्षणात महाराष्ट्रात मविआला प्रचंड मोठा फटका बसत असल्याचं दिसत आहे.
जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात भाजपला 39 ते 41 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला केवळ 7 ते 9 जागाच मिळू शकतात. असं सर्व्हेत म्हटलं आहे. तर देशात एकट्या भाजपलाच 281 जागा मिळू शकतात.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय घडेल?
2024 लोकसभा निवडणुकीत मविआला भरघोस यश मिळालं होतं. कारण त्यावेळी राज्यात मविआला एकूण 30 जागा मिळाल्या होत्या. तर महायुतीला केवळ 17 जागा मिळालेल्या. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला अक्षरश: धूळ चारत प्रचंड मोठा विजय मिळवला. ज्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून गेलं.
याचाच विचार केल्यास जर आज पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या तर राज्यातील जनता ही एनडीएच्याच पारड्यात आपलं मत टाकताना दिसत आहे.
राज्यात कोणाला किती टक्के मतं मिळतील?
- महायुती - 53 टक्के
- मविआ - 42 टक्के
- इतर - 5 टक्के

कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील?
- महायुती - 39 ते 41 जागा
- मविआ - 7 ते 9 जागा
- इतर - 0 जागा

कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात?
- भाजप - 26 जागा
- शिवसेना+राष्ट्रवादी - 14 जागा
- काँग्रेस - 4 जागा
- शिवसेना UBT+राष्ट्रवादी SP - 4 जागा

यामुळे या सर्व्हेचा विचार केल्यास लोकसभा 2024 निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने दिलेला जो कौल होता तो आता पूर्णपणे बदलताना दिसतो आहे. कारण आधी महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला जोरदार झटका दिला होता. पण आता मात्र, निवडणुका झाल्या तर पुन्हा ते महायुतीच्या पाठीशी असल्याचं सर्व्हेतून दिसून येत आहे.