विधानसभेत कोणीतरी गुटखा खाऊन थुंकलं, अध्यक्ष म्हणाले- मी 'त्या' आमदाराला पाहिलंय, आता..
विधानसभेत गुटखा खाऊन थुंकल्याची किळसवाणी घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. ज्यावरून विधानसभा अध्यक्षांनी संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विधानसभेत गुटखा खाऊन कोण थुंकलं?

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत घडली किळसवाणी घटना

विधानसभा अध्यक्षांनी सदस्यांना झापलं
लखनऊ: लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद या केवळ इमारती नाही तर ती लोकशाहीची मंदिरं आहेत. पण याच लोकशाहीच्या मंदिरात लाज आणणारे कृत्य समोर आले आहे. त्याचं झालं असं की, विधानसभेत गुटखा खाऊन एक आमदार तिथेच थुंकल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.
दरम्यान, याबाबत विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांना माहिती मिळाली की, कोणीतरी सभागृहात गुटखा खाऊन थुंकलं आहे. जेव्हा विधानसभा अध्यक्ष घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना गुटखा खाऊन तिथे थुंकलेलं दिसून आलं. कोणीतरी विधानसभेत जमिनीवर आणि भिंतींवर देखील गुटखा खाऊन थुंकलेलं आढळून आलं.
हे ही वाचा>> Abu Azmi Suspended : औरंगजेबाचं कौतुक, आयशा टाकियाचे सासरे निलंबित, कोण आहेत अबू आझमी?
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ सफाई कर्मचाऱ्यांना बोलावून गुटखा खाऊन थुकंलेलं स्वच्छ करण्यास सांगितलं. यानंतर ते विधानसभेत पोहोचले. तिथे पोहचताच ते म्हणाले की,- 'आज सकाळी मला कळले की कोणी तरी गुटखा खाऊन सभागृहातच थुकलं आहे. म्हणून मी आलो आणि ते स्वच्छ करून घेतलं. मी व्हिडिओमध्ये त्या सन्माननीय सदस्याला देखील पाहिले आहे. मला कोणत्याही व्यक्तीचा अपमान करायचा नाही. म्हणूनच मी त्याचे नाव घेत नाही.'
'ही विधानसभा सर्वांची आहे'
सतीश महाना पुढे म्हणाले, 'आतापासून सर्व सदस्यांना माझी ही विनंती आहे. जर त्यांना त्यांचा कोणताही मित्र असे करताना दिसला तर त्यांनी त्याला तिथेच थांबवावे. मी काय म्हणतोय ते समजून घ्या... ही आपल्या सर्वांची विधानसभा आहे. ही केवळ अध्यक्षांची विधानसभा नाही. ही सर्व 403 सदस्यांची समान जबाबदारी आहे.'
हे ही वाचा>> सहजासहजी नाही झाला धनंजय मुंडेंचा राजीनामा, ही आहे Inside स्टोरी.. क्रोनोलॉजी पाहा!
'ही उत्तर प्रदेशातील 25 कोटी लोकांची विधानसभा आहे. त्यामुळे ती स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ते करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मी कोणाचेही नाव घेणार नाही. त्याने स्वतः येऊन आपली चूक मान्य करावी. जर तो स्वतःहून आला तर ठीक आहे, नाहीतर मी त्याला फोन करेन.'
सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया
विधानसभेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जण याला यूपी मॉडेल म्हणत टोमणे मारत आहेत, तर काही जण लिहित आहेत - पुढच्या वेळी, तोच आमदार ते साफ करेल जो तिथे घाण करेल.