Prajakta Mali: 'सुरेश धस तुम्ही माझी जाहीर माफी मागा...', प्राजक्ता माळी संतापली!
Prajakta Mali vs Suresh Dhas: सुरेश धस यांनी माझी मागावी अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केली आहे. त्यांनी कुत्सितपणे माझ्यावर टिप्पणी केली असं म्हणत प्राजक्ताने माफी मागावी असं पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सुरेश धस यांनी मागावी अशी प्राजक्ता माळीने केली मागणी

सुरेश धस यांच्याविरोधात प्राजक्ताने महिला आयोगात केली तक्रार

पत्रकार परिषद घेत प्राजक्ताने व्यक्त केला संताप
Prajakta Mali: बीड: बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली होती. त्याचवेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं नाव घेत धनंजय मुंडेंना टोमणा लगावला होता. ज्याविरोधात प्राजक्ता माळी यांनी आज (28 डिसेंबर) महिला आयोगात तक्रार दाखल केली. ज्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी त्यांनी सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. (suresh dhas you should publicly apologize to me dont criticize actresss for your politics prajakta mali got angry)
पाहा प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत काय-काय म्हणाली
'मी गटारात दगड टाकणं योग्य समजलं नाही...'
'बीड जिल्ह्यातील माननीय आमदार सुरेश धस यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी मी सगळ्यांसमोर आली आहे. काल नाही तर दीड महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरू आहे. गेले दीड महिने अत्यंत शांतेतेन मी या सगळ्याला सामोरी जातेय. सगळ्या ट्रोलिंगला, सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सना..'
हे ही वाचा>> 'आमचा परळी पॅटर्न, इथे रश्मिका आणि प्राजक्ता माळीही येतात...', सुरेश धसांचं बोचरं विधान
'माझी ही शांतता.. माझी मूकसंमती नाही. मी माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे आमच्यावर बेतलेलं आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात, उद्वेगाच्या भरात काही तरी बरळून जाते. त्यानंतर त्या दोन वाक्यांचा मीडिया हजार व्हीडिओ करतो. तेवढेच शब्द पकडतो.'
'मग एखाद्या सेलिब्रिटीला त्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जातं. मग ती बोलते.. मग पुन्हा पहिल्या व्यक्तीला वाटतं की, आपण आता बोललंच पाहिजे. तर ती पुन्हा बोलते. ही चिखलफेक चालू राहते. महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होत राहतं. हे होऊ नये सगळ्या समाजमाध्यमांसमोर ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही. शांत बसणं हा पर्याय स्वीकारला. या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही.' असं म्हणत प्राजक्ता माळीने तिचा संताप व्यक्त केला.
'तुम्ही दुसऱ्या राजकारण्यावर कुरघोडी करता, पण आमचा कलाकारांचा काय संबंध?
'मला असा वाटलं की, हा विषय इतका खोटा आहे त्याला काही अर्थ नाही. एका सांस्कृतिक कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एका फोटो.. ती आमची एकमेव भेट.. यावरून एवढी आवई उठावी? त्याला मी का प्रत्युत्तर देऊ? म्हणून मी दुर्लक्ष केलं.'
'माझं कुटुंब, मित्र परिवार.. महाराष्ट्रातील जनता.. यांच्या कोणीही माझ्याकडे शंकेच्या दृष्टीने पाहिलं नाही आणि त्याबाबत विचारलं नाही. प्रत्येकजण भेटला तेव्हा तो हेच म्हणाला की, प्राजक्ता योग्य करतेयस. शांत राहा.. धीराने सामोरं जा. ह्या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास इतका दांडगा होता ही माझ्यासाठी जमेची बाजू होती.'
हे ही वाचा>> Beed LIVE: थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, मोर्च्यात नेत्यांचा प्रचंड संताप
'त्यामुळे मला माझ्या चारित्र्याबाबत बोलण्यासाठी समोर यावं अशी गरजच वाटली नाही. आज ही वेळ येते आहे ही अत्यंत नामुष्की आहे. ती वेळ आलीए. कारण यावर एक लोकप्रतिनिधी यावर टिप्पणी करतात.'
'एखादी आवई आहे.. खरं तर त्याला अफवेचंही स्थान नाही. पण याविषयी एखादी लोकप्रतिनिधी जे लोक.. ज्यांना आपण निवडून दिलं आहे. आपले प्रश्न विधीमंडळात मांडावे, न्याय मागावा. अशी ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखलफेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी असं वाटलं म्हणूनच मी आज तुम्हा सगळ्यांसमोर आली.'
'काल जर ते तसं बोलले नसते तर मी तशीही शांत बसलेले होते. मी यावर कधीही भाष्य केलं नसतं. काल त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे समोर यावं लागलं. एखादा लोकप्रतिनिधी लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतो. लाखो लोकं त्यांना फॉलो करते. जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारा ही लाखोंची विचारधारा होते. ते त्या गोष्टींवर ठसा उमटवतात आणि खरी आहे असं भासवतात. तेव्हा मात्र, ही फार गंभीर बाब होते.'
'माझा एक साधा प्रश्न आहे सुरेश धस साहेबांना.. तुम्ही एक राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत. तुम्ही दुसऱ्या एखाद्या राजकारण्यावर कुरघोडी करतायेत, टीका करतायेत. तुमचं जे काही चालू आहे ते लखलाभ तुम्ही ते करत राहा. या सगळ्यामध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? आमचा कलाकारांचा यामध्ये संबंध काय?' असा सवालच प्राजक्ताने आमदार सुरेश धस यांना विचारला आहे.
'परळीला कधी पुरूष कलाकार गेले नाही का?'
'बीडमध्ये काही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावर भाष्य करताना कलाकारांवर गाडी का घसरते?'
'ते इव्हेंट मॅनेजमेंटविषयी बोलत होते. की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट.. मान्य.. मग महिला कलाकारांचीच नावं का येतात? का परळीला पुरूष कलाकार कधी गेला नाही का कार्यक्रमाला?'
'इव्हेंट मॅनेजमेंटची नावं द्यायची आहेत तर पुरूष कलाकारांची नावं घ्या ना. महिला ज्या कष्टाने नाव कमावतात त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात?'
'त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली. त्याचा गैरवापर केला.. स्वत:चा टीआरपी वाढविण्यासाठी महिलांची नावं घेतली. अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली. एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आमचं काम आहे.'
'फक्त परळी नाही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन कार्यक्रम केले आहेत आणि यापुढेही करत राहीन. सगळेच कलाकार करतात. याआधी हजारो नेत्यांबरोबर, मान्यवरांबरोबर फोटो आहेत. तर तो फोटो दाखवून कोणाही बरोबर तुम्ही नाव जोडणार का?'
'महाराष्ट्रातल्या राजकारणाऱ्यांना हे कृत्य शोभत नाही. बरं ते जे बोलले आहेत ते इतकं कुत्सित आहे. काय म्हणायचं काय तुम्हाला? कुठल्याही पुरुषाच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला यशस्वी होऊ शकत नाही का?' असं म्हणत प्राजक्ताने सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.
'सुरेश धस यांना माझी माफी मागावी...'
'ज्या कुत्सितपणे जी टिप्पणी केली आणि हशा पिकवला. प्रसारमाध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं... याचं ज्यांना भान नाही त्यांना मी विनंती करते की, त्यांनी तितक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी मागावी.'
'मी महिला आयोगाकडे तक्रार नोंदवलेली आहे. कायद्याच्या चौकटीत तुम्ही कायदेशीर कारवाई करावी. मी देखील कायदेशीर कारवाई करत राहील. यासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब यांनाही विनंती करते.'
'दोन व्यक्ती दोन वाक्य बोलून गेल्या.. पण प्रसारमाध्यमं त्याचे हजार व्हिडीओ बनवतात. इतके वाईट हेडलाइन्स देतात. समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या हेडलाइन्समुळे परिणाम होऊ शकतो. त्यांचं करिअर बरबाद होऊ शकतं. ते आत्महत्या करू शकतात. तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची?'
'कोणताही आधार असल्याशिवाय मीडियाने बातम्या करू नये असे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत. अशी मी त्यांना विनंती करते.'
'मी करूणाताईंना सुद्धा विनंती करू इच्छिते की, तुम्ही स्वत: एक महिला आहात. तुम्हाला महिलांना होणारा त्रास समजू शकतात. या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलाच महिलांच्या मागे उभ्या नाही राहिल्या आणि चिखलफेक करत राहिलं तर कसं होणार?'
'तुम्हाला माझ्याबद्दल माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे. तुमच्या माहितीचा स्त्रोत अत्यंत चुकीचा आहे करूणाताई.. इथून पुढे कुठल्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय असं बोलणार नाहीत अशी विनंती आहे.' असंही प्राजक्ता यावेळी म्हणाली.