प्रविण ठाकरे, नाशिक: नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाला आज (16 एप्रिल) पहाटे सुरुवात झाली. मात्र, या कारवाईआधी मध्यरात्री या भागात तुफान राडा झाला. येथे जमावाने अचानक पोलिसांवर दगडफेक करून हिंसाचार घडवला. या घटनेत 31 पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दगडफेकीतील 15 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील एका अनधिकृत दर्ग्याला नाशिक महानगरपालिकेने (NMC) 1 एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. या दर्ग्याची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला या बांधकामाबाबत उच्च न्यायालयात कोणतेही पुरावे सादर करता आले नव्हते. त्यामुळे मनपाकडून हे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली होती. पण ट्रस्टकडून ही नोटीस गांभीर्याने घेण्यात आली नाही. ज्यानंतर आज पहाटे साडेपाच वाजता तोडकामाला सुरुवात करण्यात आली. या कारवाईसाठी मनपा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम आखली होती.
हे ही वाचा>> Nagpur Violence: औरंगजेबच्या कबरीबाबत RSS मोठं विधान, सर्वांच्या भुवया उंचावल्या
हिंसाचाराचा भडका
दरम्यान, हे अनधिकृत बांधकाम तोडकामापूर्वी मध्यरात्री परिसरात वीजपुरवठा खंडित झाली. त्याचेवळी या दर्ग्याबाबत काही समाजकंटकाकडून अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. घटनेच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, परंतु अचानक या ठिकाणी लोकांचा जमाव आला आणि त्यांनी थेट पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. तसंच परिसरात उभ्या असलेल्या काही वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली. ही हिंसक परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ सौम्य बळाचा वापर केला. यावेळी काही अश्रुधुराच्या नळकांड्या देखील पोलिसांना फोडाव्या लागल्या.
हे ही वाचा>> Nagpur Violence : दंगलीची पोस्ट, बांगलादेश ते थेट फेसबूक कंपनीशी संपर्क... नागपूर सायबरसेलनं सगळंच काढलं
मिळालेल्या माहितीनुसार, या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी हे जखमी झाले आहे. ज्यामध्ये 4 अधिकारी आणि 11 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दगडफेक करणाऱ्या १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त जमावाची समजूत काढण्यासाठी या दर्ग्याचे ट्रस्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांना बोलावण्यात आले होते, परंतु त्यांनाही जमावाने जुमानले नाही.
प्रशासनाची भूमिका
या कारवाईसाठी नाशिक महानगरपालिकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केला आहे. काठे गल्ली सिग्नल परिसरात रस्त्यावर असलेला अनधिकृत दर्गा हटविण्यासाठी पोलिसांनी आता कडेकोट बंदोबस्त लावला आहे. परिसरातील अनेक मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करून ती पर्यायी मार्गाने वळवली आहे. याशिवाय या परिसरात जमाव बंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई आहे.
काठे गल्ली परिसरात तणाव
दगडफेकीच्या या हिंसक घटनेनंतर काठे गल्ली परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. यापूर्वीही या भागात अशा कारवाईदरम्यान काही हिंसक घटना घडल्या होत्या. मध्यरात्रीच्या घटनेनंतर आता दर्गा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
नाशिक हे धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाणारे शहर आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले हे शहर मंदिरांची नगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. मात्र, अशा घटनांमुळे शहरातील सामाजिक सलोख्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT
