Sanjay Raut on VBA Seat Sharing: प्रविण ठाकरे, नाशिक: लोकसभा निवडणूक 2024 साठी महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीचं देखील जागा वाटप ठरलेलं नाही. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आलेले असले तरी वंचित बहुजन आघाडी या चौथ्या पक्षामुळे जागा वाटप अडल्याचं सध्या चित्र आहे. असं असताना मविआच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि शिवसेना (UBT) चे नेते संजय राऊत यांनी आज एक अत्यंत मोठी घोषणा केली आहे. (lok sabha election 2024 mva given 4 seats to vanchit bahujan aghadi sanjay raut announced in nashik)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत गेले काही महिने सातत्याने चर्चा करत आहे. मागील काही दिवसांपासून वंचितला किती जागा दिल्या जाव्या यावरून चर्चांच्या फैरी झडत आहेत. ज्यावरून सध्या बराच तणावही महाविकास आघाडीमध्ये आहे. याच सगळ्या घडामोडीमध्ये संजय राऊत यांनी वंचितला किती जागा देणार हे सांगून टाकलं आहे.
संजय राऊत हे आज (12 मार्च) नाशिकमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याचवेळी त्यांना वंचितला किती जागा देणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा संजय राऊतांनी याबाबत महाविकास आघाडीने वंचितला 4 जागा दिल्या असल्याचं यावेळी सांगितलं.
पाहा संजय राऊत वंचित बहुजन आघाडीच्या जागेबाबत नेमकं काय म्हणाले...
'संजय राऊत कधीच खोटं बोलत नाही.. संजय राऊत हे सत्य बोलतात. मी डॉ. आबेंडकरांच्या विचारांना मानणारा आहे. डॉ. आंबेडकर हे सत्याचा मार्ग धरून जाणारे नेते होते तर मी देखील त्याच मार्गाने जाणारा नेता आहे. मी फक्त एवढंच सांगतो की, देशातील हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी, संविधानाचं संरक्षण करण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर हवेत. हे जर मी खोटं बोलत असेल तर त्यावर माझ्याकडे उत्तर नाही.'
'संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीमधील सदस्य आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात कोणताही तिढा नाही. हे मी मित्र प्रकाश आंबडेकर यांना सांगू इच्छितो. वंचित बहुजन आघाडीने आमच्यासोबत राहिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे.'
'आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून 4 उत्तम जागांचा प्रस्ताव दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे ज्या जागांची मागणी केली होती. त्यातीलच त्या 4 जागा आहेत.'
'प्रकाश आंबेडकर किंवा आमचे विचार वेगळे नाहीत. आम्ही खोटं बोलत नाहीएत. प्रकाश आंबेडकर खोटं बोलतात असं मी कधीच बोलणार नाही. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतायेत.'
'कोणताही तेढ महाविकास आघाडीमध्ये नाही. जागा वाटप पूर्ण झालेलं नाही. फक्त आम्ही वंचितला जो प्रस्ताव दिला आहे तो प्रस्ताव वंचित आघाडी स्वीकारते का? याची आम्ही वाट पाहतोय. चर्चा ही सोशल मीडियावर होत नाही ती प्रत्यक्ष भेटून होते. असं ंम्हणत संजय राऊतांनी वंचित आघाडीला किती जागा देणार हे जाहीर केलं आहे.'
ADVERTISEMENT