माझं घराणं हे माझ्यापासून सुरू होतं, हे आत्मविश्वासाने सांगणाऱ्या पंडीत वसंतराव देशपांडेची सांगतिक कारकिर्द ही यशोशिखरावर पोहचली असली तरी त्या शिखरावर पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता. आपल्याला वसंतरावांची गाणी, नाट्यपदं आठवतात पण त्यांचा हा खडतर प्रवास आपल्यापर्यंत आजपर्यंत पोहचलेला नव्हता.. पण हा प्रवास त्यांच्याच नातवाने म्हणजेच प्रख्यात गायक राहुल देशपांडेने तीन तासांच्या सिनेमात अतिशय सुसंगत पद्धतीने मांडून रसिकांसमोर आणला आहे. या सांगतिक मैफीलीचं नाव मी वसंतराव..
ADVERTISEMENT
पंडीत वसंतराव देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तीमत्व.शास्त्रीय संगीताने नटलेली एखादी बंदीश असो , वा सिनेमातील भावगीत असो किंवा एखादं नाट्यगीत या प्रत्येक संगीत प्रकारावर वसंतरावांची गायकी आपला ठसा उमटवून जाते. आणि हाच ठसा अगदी तंतोतंत मी वसंतराव या सिनेमातून आपल्या मनावर ठसून जातो..
मी वसंतराव या सिनेमाची गोष्ट म्हणजे अक्षरक्ष अनेक अडथळ्यांवर,संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वतची ओळख निर्माण करणाऱ्या एका सच्च्या कलाकाराच्या प्रवासाची गोष्ट आहे.. आणि ही गोष्ट वसंतरावांच्या आयुष्यात घडलेल्या अगदी मोजक्या पण महत्वाच्या प्रसंगाना आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या महत्वाच्या व्यक्तिमत्वांना पुढे पुढे घेत जात अगदी समर्पक परिणाम साधते.
मग तो वसंतरावांचा लहानपणीचा नागपूरचा काळ असो, तरूणाईतला संघर्षाचा पुण्यातील काळ असो, भाई म्हणजेच पु.ल.देशपांडेसोबतची मैत्री असो, कुटुंबाची काळजी करणारा पालक असो, आणि नोकरी सोडल्यावर आपल्या गायकीवर ठाम राहून संघर्ष करून यश मिळवून पंडीत वसंतराव देशपांडे होण्यापर्यंतचा हा प्रवास खाचखळग्यांनी भरलेला असला तरी सिनेमात तो अतिशय उत्तम मांडणी करून चित्रीत करण्यात आलाय.. याचं पूर्ण श्रेय फक्त एका व्यक्तीला जातं ते या सिनेमाचा दिग्दर्शक ,मी वसंतराव सिनेमाची संहीता अतिशय उत्तमरित्या बांधणाऱ्या निपुण धर्माधिकारीला.. निपुणने पहिल्यांदाच बायोपिक हा प्रकार केला असला तरी सिनेमाच्या हाताळणीत धर्माधिकारी किती निपुण आहे हे मी वसंतराव या सिनेमातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
आपल्या आजोबांचीच भूमिका पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य राहुल देशपांडेने या सिनेमातून उचललं आहे. पण वसंतरावांची भूमिका राहुलने चांगली केली बरी केली यापेक्षा राहुल ही भूमिका जगला आहे हे समर्पक राहील. वसंतरावांच्या लकबी, चाल, बोलण्याची पध्दत राहुलने अतिशय उत्तम साकारली आहे…वसंतरावाच्या आईच्या भूमिकेत अनिता दातेने कमाल केली आहे. पु.ल.देशपांडेच्या भूमिकेत पुष्कराज चिरपूटकरने राहुलला उत्तम साथ दिली आहे.वसंतरावांच्या पत्नीच्या भूमिकेत कौमुदी वालोकरनेही उत्तम भूमिका वठवली आहे.तर दीनानाथ मंगेशकरांच्या आणि बेगम अख्तरांच्या पाहुण्या भूमिकेत अमेय वाघ आणि दुर्गा जसराज यांनी मोलाची साथ दिली आहे.
मी वसंतराव सिनेमाचं संगीत हा सिनेमाचा आत्मा आहे. सिनेमातील प्रमुख भूमिकेसह राहुल देशपांडेने सिनेमाचं संगीत दिग्दर्शनही केलं आहे. सिनेमात एकूण २२ गाणी आहेत. आणि वसंतरावांच्या लोकप्रिय पदांसह, राहुलने केलेली गाणी तितकीच श्रवणीय आहे. कसं असतं आपण जेवायला बसतो आणि आपल्यासमोर पंचपक्वानांची पंगत असते. आणि त्यातल्या प्रत्येक पदार्थ इतका रूचकर असतो. की आपण म्हणतो मजा आ गया.. मी वसंतराव सिनेमाचं ही तसंच आहे यातलं सगळंकाही अप्रतिम आहे.आणि या अश्या अप्रतिम आनंद देणाऱ्या मी वसंतराव सिनेमाला मी देतोय.. साडेचार स्टार तेव्हा गुढीपाडव्याच्या पवित्र मुहर्तावर एक उत्तम सिनेमा आपल्यासमोर येतोय.. मराठी सिनेमा तसाही दर्जेदार असतोच.. तेव्हा मी वसंतराव हा एक सर्वगुणसंपन्न आपणही पाहायला हवा.आणि दर्जेदार मराठी सिनेमांची ही गुढी उंचच उंच घेऊन जावी हीच अपेक्षा…
ADVERTISEMENT