कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी आमदार महेश लांडगेंवर गुन्हा दाखल

मुंबई तक

• 05:09 AM • 01 Jun 2021

मुलीच्या हळद आणि संगीत कार्यक्रमात गर्दी जमवून कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात आमदार महेश लांडगे आणि इतर ५० जणांच्या जमावावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. मुलीच्या हळद आणि संगीत कार्यक्रमात आमदार लांगडे यांनी मांडळ डहाळे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या […]

Mumbaitak
follow google news

मुलीच्या हळद आणि संगीत कार्यक्रमात गर्दी जमवून कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात आमदार महेश लांडगे आणि इतर ५० जणांच्या जमावावर गुन्ह्याची नोंद झाली आहे.

हे वाचलं का?

मुलीच्या हळद आणि संगीत कार्यक्रमात आमदार लांगडे यांनी मांडळ डहाळे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात २५ माणसांचा नियम मोडून गर्दी जमवली गेली. यावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणं या सर्व नियमांचा भंग करण्यात आला. हळद कार्यक्रमात डीजे च्या तालावर नाचत असताना खुद्द आमदार लांडगे यांनाही आपण नियमांचा भंग करत असल्याचं भान राहिलं नाही. सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

एरवी सामान्य माणसांनी नियम मोडले की कारवाईचा बडगा उगारणारे पोलीस लोकप्रतिनिधींकडे कानाडोळा का करतात अशी ओरड सोशल मीडियावर व्हायला लागली. अखेरीस प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आणि सोशल मीडियावरील व्हिडीओ फुटेज तपासत पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार लांडगे यांनी आपली मुलगी साक्षीचा विवाह सोहळा आळंदी येथे साध्या पद्धतीने उरकला आहे. साक्षीचा विवाह बांधकाम व्यवसायिक नंदू भोंडवे यांचा मुलगा निनादशी ठरवण्यात आला होता. ६ जूनला हा सोहळा पार पडणार होता. परंतू चहूबाजूंनी होणारी टीकेची झोड आणि गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर आमदार लांडगे यांनी मुलीचं लग्न आळंदीत साध्या पद्धतीने उरकून टाकलं आहे. या प्रकरणात पोलीस आता पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

    follow whatsapp