नांदेडचा गुरूद्वारा मागील 50 वर्षांमध्ये म्हणून मिळालेलं सोनं रूग्णालयं आणि मेडिकल कॉलेजेसची निर्मिती करण्यासाठी वापरणार आहे. नांदेडच्या तख्त श्री हजूर साहिब या गुरूद्वाऱ्याने हा निर्णय घेतला आहे. शिखांच्या पाच पवित्र तख्तांपैकी हा एक गुरूवद्वारा आहे. या गुरूद्वाऱ्याने मागील 50 वर्षात गुरूद्वाऱ्याला मिळालेलं सोनं हे रूग्णालयं आणि मेडिकल कॉलेजेसच्या निर्मितीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
तख्त जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंग यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. आज घडीला नांदेडचे लोक त्यांच्या आरोग्य समस्यांसाठी हैदराबाद किंवा मुंबईला जात आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये चांगली आरोग्य यंत्रणा असलेली रूग्णालयं उभारणं आवश्यक आहे, ज्यामुळे नांदेडच्या लोकांना इथेच चांगले उपचार घेता येतील या अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही कुलवंत सिंग यांनी स्पष्ट केलं.
तख्त जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंग यांनी आणखी काय म्हटलं आहे?
कोरोना काळात लोकांना उपचार आणि रूग्णसेवांची जास्त आवश्यकता आहे. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षात जे सोनं जमा झालं आहे त्यातून आम्ही आता रूग्णालयं आणि मेडिकल कॉलेजेस उभारणार आहोत. आजवर या गुरूद्वाऱ्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती असेललं आपलं ऋण लक्षात घेऊन आम्ही हा महत्त्वाचा निर्णय घेतो आहोत.
कोरोना काळात देशभरातल्या गुरूद्वाऱ्यांनी आणि गुरूद्वारा प्रबंधन समितींनी लोकांच्या जेवणापासून ते बेड, ऑक्सिजनपर्यंत अनेक गोष्टींची व्यवस्था केली आहे. 23 मे रोजी रूपनगर या ठिकाणी एका कोव्हिड सेंटर सुरू केलं जाणार आहे. यासाठीही शिख समुदायाने पुढाकार घेतला आहे.
दिल्लीतही कोरोना रूग्णांसाठी लंगर
दिल्लीत शिख गुरूद्वारा प्रबंधन कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितलं की लॉकडाऊन कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गुरूद्वारा बंगला साहिब कडून लंगरची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. कोरोना पीडित परिवार, कोरोना रूग्ण या सगळ्यांना लंगरद्वारे जेवण पुरवलं जातं आहे. जे स्वतः घरी जेवण तयार करू शकत नाहीत त्यांच्या घरी आम्ही डबेही पुरवत आहोत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT