Ajit Pawar News: नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संघटनात्मक बदलाचा परिणाम आता हळूहळू दिसून येत आहे. आज (28 जून) राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. याच बैठकीसाठी जे पोस्टर लावण्यात आले होते त्यातून आता अजित पवारांचा (Ajit Pawar) फोटो गायब झाला आहे. पोस्टरवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल यांचेच केवळ फोटो लावण्यात आले आहेत. या बैठकीशिवाय आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी, महिला राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसची बैठकही आहे. ( ncp political circles ajit pawar photo not placed poster ncp national executive meeting sharad pawar supriya sule)
ADVERTISEMENT
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल करून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना नवीन कार्याध्यक्ष बनवण्यात आले. यासोबतच सुप्रिया यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रमुखपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचा हा निर्णय ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात होता. अजित स्वत: पक्षाध्यक्षपदाचे दावेदार असतील, अशी अपेक्षा होती.
लोकसभा आणि विधानसभेपूर्वी शरद पवार यांनी अध्यक्ष पद सोडल्यास पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता होती. अशा स्थितीत संघटनेत दोन नवीन कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. आता सुप्रिया यांनाच कार्याध्यक्ष बनवल्याने आगामी काळात त्याच पक्षाच्या वारसदार असतील हे स्पष्ट झालं आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून स्पष्ट संदेश दिला होता तसाच काहीसा संदेश पवारांनी देखील अजितदादांना दिला आहे. पण, यावेळी शरद पवारांनी त्यांच्या राजकारणाला साजेसं अशी खेळी करत एकट्या सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केलं नाही. तर त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील कार्याध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली आहे. यावरून शरद पवारांच्या मनात नेमकं काय आहे हे आता स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार म्हणालेले, ‘मला विरोधी पक्ष नेतेपद नको, फक्त…’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत बदल झाले पण त्यात अजित पवार यांना कोणतंही स्थान देण्यात आलं नाही. एकीकडे अनेक नेत्यांवर पक्षाची जबाबदारी टाकताना शरद पवार यांनी अजित पवारांकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यांनी याबाबत असं म्हटलं होतं की, अजित पवारांकडे महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे.
या सगळ्यानंतर काही दिवसांपूर्वीच एका जाहीर कार्यक्रमात अजित पवार यांनी त्यांना विरोधी पक्ष नेतेपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, ‘1 वर्ष मी विरोधी पक्षनेते पद सांभाळलं आहे. ते सांभाळत असताना काहीचं म्हणणं आहे की, तू कडक वागत नाही.. आता म्हटलं की… आता त्यांची गचांडी धरू की काय करू? म्हणजे काय आता कळत नाही..’
हे ही वाचा>> Ajit Pawar: अजितदादा म्हणाले मला पक्षात पद द्या, शरद पवारांनी थेट…
‘पण म्हटलं आता बस झालं.. मला त्यातून आता मुक्त करा.. आणि संघटनेची जबाबदारी द्या.. आणि मग कशा पद्धतीने पक्ष चालतो… अर्थात हा अधिकार नेते मंडळींचा आहे. पण माझी इच्छा आहे.. बाकीचे वेगवेगळे इच्छा प्रदर्शित करतात. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडली आहे. त्यामुळे थोडं संघटनेत कुठलंही पद द्या. काय कसलंही पद द्या.. तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला न्यायच दाखवून देईल. एवढा शब्द देतो मी..’असं अजित पवार म्हणालेले.
अजित पवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ‘अजित दादांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, असे मला वाटते. दादांना संघटनेत संधी द्यायची की नाही हा संघटनात्मक निर्णय आहे. दादांनाही संघटेनेत काम करायचे आहे याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल.’
अजित पवार : आतापर्यंतचा राजकीय प्रवास
– अजित पवार (63 वर्षे) यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी शरद पवार यांचे थोरले बंधू अनंतराव पवार आणि आशाताई यांच्या पोटी झाला.
– सहकार क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला
– 1991 मध्ये बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले; काही महिन्यांनंतर केंद्रीय संरक्षणमंत्री झालेले काका शरद पवार यांच्यासाठी ही जागा रिकामी झाली.
– 1999 मध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये अजित पवार यांनी पाणी, ऊर्जा आणि वित्त यांसारखी खाती सांभाळली. 2010-2014 या काळात ते उपमुख्यमंत्री होते.
– 2006 मध्ये चुलत बहीण सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना शरद पवार यांचे राजकीय उत्तराधिकारी मानले जात होते.
– त्यांनी 2019 मध्ये भाजपसोबत काही दिवसांसाठी सरकार स्थापन केले. जेव्हा एमव्हीए सरकार स्थापन झाले तेव्हा अजित पवार यांना अर्थ मंत्रालयासह उपमुख्यमंत्री करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणावर कोणती जबाबदारी?
> सुप्रिया सुळे : कार्याध्यक्ष- महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला युवा, लोकसभा समन्वय जबाबदारी.
> प्रफुल्ल पटेल : कार्याध्यक्ष – मध्य प्रदेश, राजस्थान, गोवाची जबाबदारी.
हे ही वाचा>> NCP : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपने थेट 10 कारणंच सांगितली
> सुनील तटकरे : राष्ट्रीय सरचिटणीस – ओडिशा, पश्चिम बंगाल, प्रभारी शेतकरी, अल्पसंख्याक विभाग.
> नंदा शास्त्री : दिल्ली प्रदेशाध्यक्ष.
> फैसल : तामिळनाडू, तेलंगणा, केरळची जबाबदारी.
ADVERTISEMENT