Raj Thackeray Ganga River vs Nitesh Rane: मुंबई: 'संध्याकाळी 7.30 वाजेनंतरचं पाणी कसं चालतं?' अशी बोचरी टीका करत भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे. गंगेच प्रदूषित पाणी आणि त्यावरून राज ठाकरेंनी उडवलेली खिल्ली यावरून नितेश राणे मात्र आक्रमक झाले आणि त्यांनी थेट संध्याकाळी 7.30 नंतरचं पाणी कसं चालतं त्याने खाज येत नाही का? असा जहरी सवाल केला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, या सगळ्यावरून आता एक नवा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे गंगाजल वि. संध्याजल याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे आपण समजून घेऊया.
हे ही वाचा>> बाळा नांदगावकरांनी कुंभमेळ्यातून आणलेलं गंगेचं पाणी Raj Thackeray का प्यायले नाहीत?
दूषित गंगेचं पाणी पिणार नाही. असं राज ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं. ज्यावरून नितेश राणे आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर थेट वार केला आहे. संध्याकाळी 7.30 वाजेनंतरचं पाणी घेताना खाज येत नाही का? असं म्हणत राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
गंगेच्या पाण्यावरून राज ठाकरे काय म्हणालेले?
मला सांगा.. आता तो सोशल मीडिया आलाय, पूर्वीच्या काळी ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावर बघतोय. माणसं, तिथे आलेल्या बाया वैगरे.. घासतायेत.. आणि बाळा नांदगावर, साहेब गंगेचं पाणी.
अरे कोण पिणार ते पाणी.. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही?
एक नदी देशामधील स्वच्छ नाहीए.हे आमचे बाळा नांदगावकर त्या छोट्याशा कमंडलूमधून घेऊन आले पाणी.. हाड म्हटलं मी नाही पिणार. ह्याने तिथे काही तरी केलंए आणि मी इथे पितोय.
हे ही वाचा>> मल्हार मटण, झटका आणि हलाल... हे नेमकं आहे तरी काय? महाराष्ट्रात मटणावरून राडा!
या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धा यातून बाहेर या जरा.. डोकी हलवा नीट. राज कपूरांनी मध्ये चित्रपट पण काढला. लोकांना वाटलं झाली गंगा साफ. त्यात वेगळीच गंगा. लोकं म्हणाले अशी जर गंगा असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत. अजूनपर्यंत गंगा काही साफ झालेली नाही. अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.
नितेश राणेंचा राज ठाकरेंवर हल्ला
कोणाला अचानक खाज यायला लागणार, बाकीचं पाणी घेताना खाज येत नाही. ते 7.30 नंतरचं पाणी चालतं. फक्त आमच्या गंगाजलवरच प्रॉब्लेम?
मी जाऊन आलेलो माझ्या आईबरोबर.. त्या दिवसापासून ते आतापर्यंत.. मला काही त्रास झालेला नाही. एवढे कोट्यवधी लोकं ते आमच्या महाकुंभला गेले, गंगास्नान केलं. पण फक्त आमच्या हिंदू धर्माची बदनामी करायची.
हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहायचं. हा एककलमी कार्यक्रम ओ... अहो बकरी ईदच्या वेळेस जेव्हा बकरी कापतात ते पाणी काय हातात घेऊन काय बाजूला करतात काय? तेव्हा कोण काय बोलताना दिसलं नाही.
सगळं काय आम्हा लोकांनाच, हिंदूनी असं केलं पाहिजे. आमच्या श्रद्धेचा विषय आहे तो. सगळं काय ना हिंदू धर्माकडे बडबडत बसायचं नाही. जे बोलायचं ना.. मग अन्य धर्मांना पण बोलून दाखवा. त्यांना बोलण्याची हिंमत करा. त्यांच्या गोष्टी थांबवा. ज्या काही हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्र म्हणून आम्ही या आमच्या हिंदू राष्ट्रात प्रत्येक सणासुदी अभिमानानेच साजरं करणार. कोणाचीही काळजी करण्याचं कारण नाही. असं म्हणत नितेश राणेंनी राज ठाकरेंना टार्गेट केलं.
दरम्यान, राज ठाकरेंनी जे विधान केलं होतं. त्यावरून भाजप नेते हे सुरुवातीला सावध प्रतिक्रिया देत होते. पण नितेश राणे यांनी थेट संध्याकाळचं पाणी काढत राज ठाकरेंना डिवचलं आहे.
याशिवाय राज ठाकरेंनी गंगाजलबाबत जे विधान केलं आहे त्याबाबत त्यांनी माफी मागावी अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.
पण हा वाद तूर्तास तरी थांबलेला नाही. कारण यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. तसंच येत्या काही दिवसातच मनसेचा गुढीपाडवा मेळावा देखील पार पडणार आहे. त्यामुळे त्या मेळाव्यात राज ठाकरे हे नितेश राणेंना काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
