Sharad Pawar Ajit Pawar meet : ‘महाराष्ट्र म्हणजे गंमत नाही’; ठाकरेंचा शरद पवारांना इशारा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Sharad pawar Ajit pawar meets : uddhav Thackeray disappointed on sharad pawar ajit pawar meeting.
Sharad pawar Ajit pawar meets : uddhav Thackeray disappointed on sharad pawar ajit pawar meeting.
social share
google news

Sharad Pawar Ajit Pawar meet : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्योजक अतुल चोरडीयांच्या घरी बैठक झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षही नाराज झाले आहेत. ही नाराजी बाहेर आली असून, उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामना अग्रलेखातून शरद पवारांना इशारा देण्यात आलाय. गुप्त भेटीवर स्फोटक भाष्य करण्यात आलं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्मावरही बोट ठेवलं आहे. (Uddhav Thackeray gets Disappointed on Sharad Pawar Ajit Pawar Meeting)

ADVERTISEMENT

पवार काका पुतण्या भेटीबद्दल सामना अग्रलेखात म्हटलंय की, “उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गमतीचे आहे. काही भेटी उघडपणे झाल्या, तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भारतीय जनता पक्षाचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून पाठवतायत काय? या शंकेला बळ मिळत आहे. अर्थात अजित पवारांच्या अशा भेटीने संभ्रम होईल, वाढेल यापलीकडे जनतेची मने पोहोचली आहेत. या रोजच्या खेळाने मनास एक प्रकारची बधिरता आली आहे व त्यास सध्याचे राजकारण जबाबदार आहे.”

वाचा >> Sharad Pawar Ajit Pawar Meet: शरद पवार अजित पवारांचे मनोमिलन होणार? दिले संकेत

“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अनेकदा परखड विधाने करतात. त्यातही बऱ्याचदा गंमत असते. ‘अजित पवार हे ‘मविआ’त परत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. अजितदादांना उपरती झाली असेल म्हणून ते शरद पवारांना भेटले असतील’, असे नाना म्हणाले. त्याआधी नाना यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्रातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. राज्यातील सरकार हे ‘गंमत जंमत’ सरकार आहे.’ नानांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत, पण त्यात थोडी भर टाकून सांगतो, पवार काका-पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत ठरत आहे. नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झालेय. शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते व ते बरे नाही.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘एकनाथ शिंदेंची झोप उडाली की…’

ठाकरेंनी अग्रलेखात म्हटलंय की, “अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यावर सगळय़ात मोठी गंमत झाली ती एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाची. आता तर शिंदे आजारी पडले असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे व त्यांना जबरदस्तीने इस्पितळात दाखल करू, असे शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर केले. शिंदे हे 24 तास काम करतात म्हणून ते आजारी पडले, पण शिंदे 24 तास काम करतात ते महाराष्ट्रात कोठेच दृष्य स्वरूपात दिसत नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली असेल तर त्यास 24 तास काम करणे असे म्हणता येत नाही.”

वाचा >> Kalwa Hospital :कळवा रुग्णालयात ज्यांना मृत्यूने गाठलं, ‘त्या’ 18 रुग्णांची नावं काय?

“शिंदे यांची झोप उडाली की, ते ऊठसूट हेलिकॉप्टरने साताऱ्यातील त्यांच्या शेतावर आराम करतात. म्हणजे ‘24 तास काम व पुढचे 72 तास आराम’ असे त्यांच्या जीवनाचे गणित दिसते व शिंदे यांच्या आजाराचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले जाते. अजित पवार सरकारात घुसल्यावर शिंदे व त्यांच्या गटाच्या हृदयाचे ठोके वाढले आणि मन अस्थिर झाले. त्यात अजित पवार हे अधूनमधून शरद पवारांना भेटू लागल्याने या सगळ्यांच्याच लहान मेंदूस त्रास सुरू झाला, पण त्यासाठी दूर साताऱ्यात जाऊन सततच आराम करणे हा उपाय नाही”, असा चिमटा शिवसेनेने (युबीटी) एकनाथ शिंदेंना काढला आहे.

ADVERTISEMENT

वाचा >> Maharashtra Politics : राज ठाकरेंसोबत युती… उद्धव ठाकरेंनी विषयच संपवला

“शिंदे गटाने त्यांच्या नेत्यास तत्काळ मुंबई-ठाण्यातील इस्पितळात दाखल करून उपचार सुरू केले पाहिजेत. शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे साताऱ्यात जाऊन गावठी उपचार, जडीबुटी, जादूटोणा, बुवाबाजीच्या माध्यमातून उपचार करून घेणे योग्य नाही. आरोग्य हीच संपत्ती आहे व त्या संपत्तीचे रक्षण खोक्यांनी होत नाही”, असा प्रहार अग्रलेखातून शिंदेंवर करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

‘अजित पवारांमुळे शिंदेंना गुदमरल्यासारखं होतंय’

“दुसरे असे की, मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्मास आलेले नाही. ‘मी पुन्हा येणार’वाल्यांनाही ‘उप’ वगैरे होऊन उपऱ्यांच्या पखाली वाहाव्या लागत आहेत, पण शिंदे यांना वाटते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपणच, पण अजित पवारांमुळे त्यांच्या श्वासनलिकेत अडथळे निर्माण झाले व त्यांना अलीकडे गुदमरल्यासारखे होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नक्की काय त्रास होतोय? त्यांचा आजार किती खोलवर पसरलाय? आजाराचे मूळ काय? याबाबत आरोग्य मंत्र्यांनी विशेष बुलेटिन जारी केले तर बरे होईल”, असा टोला अग्रलेखातून लगावला आहे.

वाचा >> शिंदे-अजित पवारांवर मतदार प्रचंड नाराज?, सर्व्हेतून धक्कादायक खुलासे

“शिंदे यांची प्रकृती चिंता करावी अशी आहे हे आमदार शिरसाटांचे म्हणणे खरे असेल तर त्यांना लगेच अतिदक्षता विभागात दाखल करून पुढचे उपचार करावे लागतील व त्यांच्या आसपास अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना फिरकू न देण्याची काळजी घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणास सध्या ज्या आजाराने ग्रासले आहे, त्या आजाराचा किडा मुख्यमंत्र्यांच्या शरीरात असून त्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर हा किडा महाराष्ट्राचे समाजमन पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे व मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारंवार विश्रांतीसाठी साताऱ्यातील शेतावर हेलिकॉप्टरने उतरतात हा महाराष्ट्रास लागलेला मानसिक आजार आहे. या दोन्ही आजारांत गुप्त असे काहीच राहिलेले नाही. राजकारणातील डिजिटल युगात गुप्त राहील असे काहीच नाही.”

“चार दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले व त्या भेटीत महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या दृष्टीने गुप्त खलबते झाल्याची गुप्त बातमी फुटल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा आजार बळावला. त्यांच्या गटाच्या लोकांनी हा आजार गांभीर्याने घेतला पाहिजे. खरे तर हा रोग महाराष्ट्राला लागला आहे व अशा रोगाचे लवकरात लवकर उच्चाटन होईल तेवढे बरे. अनेक आजारांनी सध्या महाराष्ट्र कृश व जर्जर झाला आहे. त्यात दिल्लीच्या टोळधाडी महाराष्ट्रावर हल्ले करीत आहेत. या सगळय़ातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहील. दोन पवारांची ‘गंमतभेट’ व मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. महाराष्ट्र म्हणजे ‘गंमत जंमत’ नाही हे आम्ही येथे परखडपणे बजावत आहोत”, असा इशारा ठाकरेंनी सामना अग्रलेखातून शरद पवारांना दिला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT